देशविदेश
Trending

शिक्षणासाठी गोळ्या झेलणारी मलाला युसूझाई झाली पदवीधर

लंडन : शिक्षणासाठी दहशतवाद्यांच्या गोळ्या झेलणारी मलाला युसूझाईने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठातून मलालाने राजकारण, अर्थशास्त्र आणि तत्वज्ञान विषयातून पदवी मिळवली आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर मलाला चर्चेत आली होती. मुलींनी शिक्षण घेऊ नये, असा फतवा दहशतवाद्यांनी काढला होता. मात्र, त्याला न जुमानता मलाला शाळेत जात होती.

­मलाला युसूझाईला नोबेल शांतता पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. मलाला युसूझाईने पदवीचे शिक्षण पूर्ण केल्याची माहिती स्वत: च्या ट्विटर हॅण्डलवर दिली. ऑक्सफोर्ड विद्यापीठातून मी पदवीधर झालो असून आनंदाचा क्षण असल्याची भावना तिने व्यक्त केली. मलालाच्या कुटुंबीयांनीदेखील तिचे ग्रॅज्यूएशन सेलिब्रेट केले. मलालाने या ट्विटमध्ये सध्या तरी मी नेटफ्लिक्स पाहणं, वाचन आणि झोप घेणार असल्याचे म्हटले आहे. भविष्यात नेमकं काय करायचे आहे, याचे अजून नियोजन केले नसल्याचे तिने ट्विटमध्ये म्हटले.
पाकिस्तानमध्ये शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या मलालाचा मोठा विरोध तालिबानच्या दहशतवाद्यांनी केला होता. परंतु मलालाने सर्व प्रकारचे धोके पत्करून आपले शैक्षणिक कार्य नेटाने पुढे रेटले. यामुळे चवताळलेल्या दहशतवाद्यांनी २०१२ मध्ये मलालाला ठार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या हल्ल्यातून ती बचावली. तिच्या कार्याची दखल घेत मलालाला शांततेचा २०१४ सालचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारणारी ती जगातील सर्वात तरुण व्यक्ती होती. तर, २०१७ मध्ये मलालाला जगातील सर्वात तरूण शांतीदूत बनण्याचा सन्मान प्राप्त झाला. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी या सन्मानासाठी मलालाच्या नावाची घोषणा केली होती. लहान मुलींमध्ये शिक्षणाच्या प्रसाराचे काम मलालाच्या हातून अधिक जोमाने वाढावे या हेतूने हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे गुटेरेस यांनी सांगितले

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close