
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ट्विटरचा वाद झाल्यानंतर ट्रम्प यांनी सोशल मीडिया कंपन्यांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता ट्रम्प आणि फेसबुकमध्येही वाद होण्याची चिन्हं आहेत. ट्रम्प यांना फेसबुकने मोठा झटका दिला आहे. फेसबुकने डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेन्स यांच्या जाहिराती हटवल्या आहेत.
ट्रम्प यांच्या जाहिरातीमध्ये लाल रंगाचा उलटा त्रिकोण दर्शवला होता. या चिन्हाचा वापर नाझींनी राजकीय कैदी, कम्युनिस्ट आणि छळछावणीत कैद असलेल्या नागरिकांसाठी केला होता. फेसबुकचे नॅथेनियल ग्लीचर यांनी ट्रम्प यांची जाहिरात हटवण्यात आली असल्याचे मान्य केले आहे. द्वेष पसरवणाऱ्या कोणत्याही विचारधारांशी निगडीत चिन्हांना दाखवण्यास मनाई करण्यात आली आहे. फक्त एखादा संदर्भासह द्वेष पसरवणाऱ्या कृतीचा निषेध करण्यासाठी संबंधित चिन्हाचा वापर करण्यास परवानगी असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्लीचर यांनी सांगितले की, कोणत्याही योग्य कारणांशिवाय ते चिन्ह दिसत असल्यामुळे जाहिरात काढण्यात आली. फेसबुकच्या नियमांचे पालन न झाल्यास जाहिराती हटवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर, त्या चिन्हाचा वापर ‘एन्टीफा’विरोधात करण्यात आला असल्याची माहिती ट्रम्प यांचे प्रचार मोहिमेचे संपर्क संचालक टिम मुर्तो यांनी सांगितले.
मुर्तो यांनी सांगितले की, जाहिरातीत वापरण्यात आलेल्या चिन्हाचा ‘अॅण्टी डिफेमेशन लीग’मध्ये समावेश नाही. अमेरिकेत जहाल डाव्या गटाला ‘अॅण्टीफा’ संबोधण्यात येते. नुकत्याच झालेल्या वर्णद्वेषी आंदोलनात अॅण्टीफा गटाचा सहभाग होता. या आंदोलनाला हिंसक वळणदेखील याच गटाने दिले असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. मात्र, याबाबतचे कोणतेही पुरावे समोर आले नाहीत.
दरम्यान, मे महिन्याच्या अखेरीस अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटबाबत ट्विटर कंपनीने प्रथमच सावधगिरीचा इशारा दिला होता. ट्रम्प यांनी केलेल्या दोन ट्विटबाबत ट्विटरने इशारा झळकवला. या दोन्ही ट्वीटच्या अखेरीस ट्विटरने एक लिंक दिली आहे. ‘मेल इन बॅलट्सची सत्यता तपासा’ अशी ही लिंक आहे. या लिंकवर क्लिक केल्यास युजर ट्विटर मोमेंट्स पेजवर पोहोचतात व तेथे ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटच्या विषयाची सत्यता तपासता येते. तसेच ट्रम्प यांच्या दाव्याबाबतच्या नव्या बातम्याही वाचता येतात. त्यानंतर ट्रम्प यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त करत टीका केली होती. त्यानंतर मिनिआपोलिसमध्ये वर्णद्वेषी आंदोलनादरम्यान हिंसाचार उफाळून आल्यानंतर ट्रम्प यांनी ट्विट केले होते. त्यावरही ट्विटरने कारवाई करत ट्विट हाइड करून ट्विट हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा इशारा झळकावला होता.