देशविदेश
Trending

जेव्हा आई-मुलीनं दिला शहिदाच्या पार्थिवाला खांदा!

हुतात्मा नायब सुभेदार सतनाम सिंह यांच्या पार्थिवाला त्यांचा १८ वर्षीय मुलगा प्रभज्योतसिंह यानं दिला मुखाग्नी

गुरदासपूर, पंजाब : लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या विश्वासघातकी हल्ल्यात २० जवानांनी आपले प्राण गमावले. या जवानांमध्ये पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्याच्या भोजराज गावातील हुतात्मा नायब सुभेदार सतनाम सिंह यांचाही समावेश होता.  या वीराला त्याच्या गावानं आणि संपूर्ण देशानं अश्रूभरल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप दिला. सतनाम यांच्या पार्थिवाला आई जसबीर कौर आणि मुलगी मनप्रीत कौर यांनी मोठ्या अभिमानानं खांदा देऊन स्मशानभूमीपर्यंत नेलं. स्मशानभूमीत सतनाम सिंह यांच्या पार्थिवाला त्यांचा १८ वर्षीय मुलगा प्रभज्योतसिंह यानं मुखाग्नी दिला. 

सतनाम सिंह हे सेनेच्या ३ मीडियम रेजिमेंटचे नायब सुभेदार होते. त्यांचं पार्थिव शरीर शुक्रवारी विशेष विमानानं चंदीगडला आणि त्यानंतर त्यानंतर चंदीगड ते गुरदासपूरच्या तिब्बडी कॅन्टमध्ये आणण्यात आलं. तिरंग्यामध्ये लपटलेला आपल्या मुलाचा मृतदेह पाहताना सतनाम सिंह यांची आई जसबीर कौर, पत्नी जसविंदर कौर आणि मुलगी मनप्रीत कौर यांच्या आक्रोश उपस्थितांच्या काळजाला घरं पाडत होता.
‘ज्या सेनेचं मीठ गेले २४ वर्ष खाल्लं त्या सेनेसाठी शहीद झालो तरी स्वत:ला सौभाग्यशाली समजेन’ हे सतवीर सिंह यांचे शब्द त्यांच्या पत्नीच्या स्मरणात होते.

आपले वडील जागीर सिंह यांच्या नावावर एक वृद्धाश्रम उघडण्याची सतनाम सिंह यांची इच्छा होती. पुढच्या वेळी सुट्टीवर घरी येईन तेव्हा या कामाला सुरुवात करू असा निश्चयही त्यांनी केला होता… पण, आता मात्र हे काम अपूर्ण राहिलंय. गेल्या वेळी सुट्टीवर आला होता तेव्हा लाकडं कापण्याचं काम केलं. आता त्याच लाकडांचा वापर अंत्यविधीसाठी करण्यात येतोय, हे आपल्या तरुण मुलाला चितेवर पाहताना वडील जगीर सिंह यांना सहन होणं नव्हतं.तरुण मुलाला गमावण्यापेक्षा मोठ दु:ख नाही पण आम्हाला त्याच्या हौतात्म्याचा अभिमान आहे, असं सतनाम सिंह यांची आई जसबीर कौर यांनी म्हटलं. तर ‘आपल्याच युनिटमध्ये माझ्या मुलानं अधिकारी बनावं आणि मी त्याला सॅल्युट ठोकावं हे बाबांचं स्वप्न होतं’ हे आठवताना सनमान यांचा मुलगा प्रभज्योतचे अश्रू थांबत नव्हते.

सतनाम सिंह यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी, सेनेच्या १८७१ फिल्ड रेजिमेंटच्या जवानांनी मेजर विनय पराशर यांच्या उपस्थितीत शहिदाला श्रद्धांजली अर्पण केली.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close