खेळ खेळाडूदेशविदेशमहाराष्ट्र
Trending
23 जून ऑलिम्पिक दिन का साजरा होतो – संजय दुधाणे
“घरात रहा, खेळत रहा, तंदुरुस्त रहा…अजित पवार यांच्या जागतिक ऑलिंपिक दिनाच्या शुभेच्छा

– संजय दुधाणे, ऑलिम्पिक पत्रकार, लेखक
पॅरीसमध्ये ऑलिम्पिक अभ्यासक बॅरिन कुबर्टिन यांनी 23 जून 1894 रोजी जागतिक ऑलिम्पिक संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. हाच दिवस आता जगभर ऑलिम्पिक दिन म्हणून साजरा केला जातो. ऑलिम्पिकची मूल्य सर्वसामान्यांपर्यंत जावी यासाठी हा दिवशी ऑलिम्पिक डे रन म्हणजेच ऑलिम्पिक दौड आयोजित केली जाते. या निमित्ताने आबालवृद्धाचे ऑलिम्पिकच्या विश्वप्रणालीशी नाते जुळते.
वय, लिंगभेद विसरून खेळाडू नसलेल्या मानव समाजाला खेळण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे ऑलिम्पिक दिनाचे ध्येय आहे. 23 जून 1987 पासून ऑलिम्पिक दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. सुरूवातीला 45 देशात ऑलिम्पिक दिनानिमित्त ऑलिम्पिक दौड आयोजित केली जायची. आता 205 देशात ऑलिम्पिक डे रन होते. भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या वतीने देशातील सर्वच राज्यात ऑलिम्पिक दौडीत हजारो जण धावत असतात. महाराष्ट्रात ऑलिम्पिक दिन पुण्यात साजरा केला जातो. हजारो शालेय विद्यार्थी पुण्यातील ऑलिम्पिक दौडीत सहभागी होत असतात. या दिवशी ऑलिम्पिकपटूंचा गौरव समारंभही केला जातो.
जागतिक ऑलिम्पिक संघटना म्हणजेच आयओसीने ऑलिम्पिक दिन कसा साजरा करावे याची मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. त्यानुसारच देशोदेशीच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना व राज्य ऑलिम्पिक संघटना हा दिवस मोठ्या दिमाख्यात साजरा करतात.
ऑलिम्पिक दिनानिमित्त आयओसीने 17 ते 24 जून हा कालावधी ऑलिम्पिक सप्ताह म्हणून जाहिर केला आहे. या दरम्यान ऑलिम्पिक डे रन, ऑलिम्पिक प्रदर्शन, ऑलिम्पिक परिसंवाद, ऑलिम्पिकपटूंशी भेट असे विविध क्रीडामय कार्यक्रम ऑलिम्पिक सप्ताहात जगभर आयोजित होतात.

यंदा मात्र कोरोना संकटामुळे हा दिवस जगभर डिजिटल माध्यमाव्दारे साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातही ऑलिम्पिक दिन यंदा फेसबुक लाईव्ह, रेडिओवर खेळाडू, संघटकांच्या मुलाखतीने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विशेष संदेशही राज्याच्या खेळाडू, क्रीडाशौकिनांना दिला आहे.
अजित पवार यांच्या जागतिक ऑलिंपिक दिनाच्या शुभेच्छा
कोरोनाच्या संकटकाळातही खेळांकडे दुर्लक्ष करु नका. घरात, घराच्या अंगणात, घराच्या गच्चीवर, सोसायटी आवारात शक्य आहे त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करुन खेळ अवश्य खेळा. दररोज व्यायाम करा. शारिरिक हालचाली वाढवणारे, मानसिक तणाव कमी करणारे खेळंच, कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यास आपल्याला मदत करतील, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्यातील जनतेला, 23 जून या जागतिक ऑलिंपिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार हे जागतिक ऑलिंपिक दिनाच्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, आपल्यापैकी प्रत्येकानं किमान एकतरी खेळ अवश्य खेळला पाहिजे. खेळामुळे शरीर, मन तंदुरुस्त राहते. खेळभावना वाढीस लागते. कोरोनासंकटामुळे सध्या मैदानावर खेळण्यास निर्बंध असले तरी प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घरात, आवारात, गच्चीवर जिथं शक्य आहे तिथं खेळलं पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे.
जागतिक ऑलिंपिक दिनी, दरवर्षी विविध स्पर्धांचं आयोजन करुन खेळाडूंना एकत्रित केलं जातं. मुलांमध्ये, युवकांमध्ये खेळांचा प्रसार व्हावा यासाठी उपक्रम राबविले जातात. यंदा त्यापैकी काहीही करता येत नसल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी खंत व्यक्त केली आहे. जागतिक ऑलिंपिक दिनाच्या शुभेच्छा देत असताना, महाराष्ट्राचा, देशाचा, भारतीय क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढवण्यासाठी योगदान दिलेल्या खेळाडूंचं, क्रीडा संघटक, क्रीडा कार्यकर्त्यांचं, क्रीडा रसिकांचंही उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले असून आभार मानले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे घरात रहा, पण खेळत रहा. तंदूरुस्त रहा, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
Share