पुणेमहाराष्ट्र
पुण्यात ऑलिम्पिक पदक पूजनाने ऑलिम्पिक दिवस साजरा
ऑलिम्पिकपटू पद्मश्री मुरलीकांत पेटकर, बाळकृष्ण अकोटकर ,मारूती आडकर यांचा ध्रुवतारा फौऊडेशनच्या वतीने गौरव

पुणे : पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने जिंकलेल्या पहिल्या ऑलिम्पिक सुवर्ण पदकाचे पूजन व ऑलिम्पिकपटूंचा सन्मान करून पुण्यात 21 जून हा ऑलिम्पिक दिन साजरा करण्यात आला.
पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकणारे मुरलीकांत पेटकर यांच्या निवासस्थानी सामाजिक अंतर राखून ऑलिम्पिक दिन साजरा झाला. यावेळी ऑलिम्पिक पटू मारुती आडकर, धुव्रतारा फौऊडेशनचे अध्यक्ष संजय दुधाणे,सचिव महेश मालुसरे, डाॅ संजय आव्हाळे, माधव डोख आदी मान्यवर उपस्थित होते. देशाचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव नामदेव शिरगांवकर यांनी जागतिक ऑलिम्पिक दिनाचे महत्व फेसबुक माध्यमातून विशद केले.
ऑलिम्पिकवरील पुस्तके व श्रीफळ देऊन ऑलिम्पिकपटूंना गौरविण्यात आले. यावेळी पेटकर, आडकर व लेखक दुधाणे यांनी आपल्या ऑलिम्पिक आठवणींना उजाळा दिला.
सुवर्ण पदक जिंकल्यानंतर देशाचा तिरंगा सर्वांच्च स्थानी झळकला तो माझ्या जीवनाचा आनंदाचा क्षण मला आजही आठवतो असे सांगून पेटकर यांनी 1965 भारत -पाक युद्धातील विजय, 9 गोळ्या लागल्याने आलेले अपंगत्व व त्याच्यावर मात करून जलतणात जिंकलेल्या पदकाचा इतिहास जिंवत केला.
कुस्ती हा ऑलिम्पिकमध्ये देशाला खात्रीशीर पदक देणारा खेळ असून महाराष्ट्रातील कुस्तीगीर आता ऑलिम्पिकसाठी सज्ज होत असल्याचे मारूती आडकर यांनी सांगितले.
क्रीडा लेखक संजय दुधाणे यांनी आपल्या लंडन व रियो ऑलिम्पिकमधील अनुभव सांगून ऑलिम्पिक वातावरण निर्माण केले. हा संपूर्ण कार्यक्रम फेसबुक लाईव्ह व्दारे जगभरातील क्रीडा शौकिनांनी पाहिला
या कार्यक्रमानंतर निगडी येथे ऑलिम्पिकपटू बाळकृष्ण अकोटकर यांच्या घरी जाऊन धुव्रतारा फौऊडेशनने सत्कार केला. यावेळी अकोटकर यांनी आपल्या टोकिओ आॅलिम्पिकच्या आठवणींना उजाळा दिला
छायाचित्र ओळ : ऑलिम्पिक पदक प्रदर्शित करताना मुरलीकांत पेटकर ,डावीकडून महेश मालुसरे, मारूती आडकर, संजय दुधाणे, पेटकर, संजय आव्हाळे
Share