खेळ खेळाडू
ऑनलाईन कॅरम स्पर्धेत भारताचा जयघोष, रियाझ सुपरफास्ट

पुणे – भारतीय कॅरम महासंघाच्या वतीने सुरू असलेल्या आगळ्या वेगळ्या इंडिया चॅलेंज २०२० ऑनलाईन कॅरम स्पर्धेीत तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी आपले वर्चस्व कायम राखले. यातही रियाझ अकबर अली याचा धडाका जबरदस्त होता. पहिल्या दोन फेरीत फारशी चमक दाखवू न शकलेल्या रियाझने तिसऱ्या फेरीत जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना बाजी मारत तिसऱ्या फेरी अखेरीस एकूणात तिसरा क्रमांक मिळविला. पुरुष विभागात के. श्रीनिवास तिसऱ्या फेरीतील अपयशानंतरही सर्वसाधारण आघाडी टिकवून आहे. महिला विभागात तिसऱ्या फेरीत रश्मी कुमारी हिने पुन्हा लाईनवर येत बाजी मारली आणि आपले अव्वल स्थान भक्कम केले.
तिसऱ्या फेरीत लक्षात राहिला तो रियाझ अकबर अली. कमालीच्या एकाग्रतेने त्याने २ व्हाईट आणि तीन ब्लॅक स्लॅम नोंदवताना ९ दोषांकासह तिसऱ्या फेरीत बाजी मारली. पहिल्या दोन फेरी सहज जिंकणारा के. श्रीनिवास तिसऱ्या फेरीत पहिल्या दहातही येऊ शकला नाही. पण, पहिल्या दोन फेरीतील सरासरीने त्याला तारले. तो आता एकूण ५३ दोषांक आणि २.२१ सरासरी राखून आपली आघाडी टिकवून आहे. तिसऱ्या फेरीत कॅनडाच्या लुई फर्नांडिस याने ४ ब्लॅक स्लॅमची नोंद करताना २० दोषांकासह दुसरा क्रमांक मिळविला. एकूणात मात्र तो आठव्या स्थानावर आहे. तिसऱ्या फेरीत २१ दोषांकासह तिसऱ्या स्थानावर आलेला प्रशांत मोरे एकूणात ६१ दोषांक आणि २.५४च्या सरासरीने दुसऱ्या स्थानावर आहे. रियाझ तिसऱ्या फेरीतील कामगिरीने आता ६३ दोषांक आणि २.६४च्या सरासरीने तिसऱ्या स्थानावर आला आहे. भारताचाच योगेश धोंगडे चौथ्या स्थानावर आहे.

महिला विभागात रश्मी कुमारी १०७ दोषांकासह पहिल्या स्थानावर कायम आहे. दुसऱ्या फेरीत काहिशी मागे राहिलेली रश्मी तिसऱ्या फेरीत पुन्हा एकदा आपली लय राखून खेळली. तिने ३१ दोषांकासह बाजी मारली. आएशा साजिद हिने ४५ दोषांक मिळवत तिसऱ्या फेरीसह सर्वसाधारण दुसरे स्थान कायम राखले. श्रीलंकेच्या रोशिता जोसेफ हिने देखील सातत्यपूर्ण कामगिरी करताना १३९ दोषांकासह सर्वसाधाराण तिसरे स्थान कायम राखले. तिसऱ्या फेरीत तीन ४४ दोषांकासह तिसरी आली.
अशी होईल उपांत्य फेरी
स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आली असून, उद्याच्या चौथ्या फेरीनंतर सर्वसाधारण गटातील पहिले चार खेळाडू बाद फेरीत पोचतील. यातील आघाडीवर असणारा खेळाडू थेट अंतिम फेरीत प्रवेश करतील. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील खेळाडूंमध्ये एलिमिनेटर लढत होईल. त्यातील विजेता दुसऱ्या क्रमांकावरील खेळाडूशी उपांत्य फेरीत खेळेल आणि त्यातील विजेता अंतिम फेरीत पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूचा आव्हानवीर असेल.
Share