
पुणे – भारतीय कॅरम संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंडियन चॅलेंज २०२० ऑनलाईन कॅरम स्पर्धेत भारताच्याच के. श्रीनिवास आणि नाग ज्योती यांनी विजेतेपद मिळविले. लॉकडाऊनच्या खडतर काळात खेळाडूंना कार्यरत राहण्यासाठी या आगळ्या ऑनलाईन चॅलेंजची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
जगभरातील १५ देशाच्या खेळाडूंनी हे चॅलेंज स्विकारले होते. मात्र, ते पेलण्याचे आणि त्यावर मात करण्याचे कौशल्य पुरुष विभागात श्रीनिवास आणि महिला विभागात नाग ज्योतीने दाखवले. पहिल्या फेरीपासून श्रीनिवासने निर्विवाद वर्चस्व राखले. त्याचवेळी नाग ज्योती या उदयोन्मुख खेळाडूने आपल्या आदर्श खेळाडूंवर मात करून आपले नाणे खणखणीत वाजवले.
पहिल्या दोन फेऱ्यांनंतर श्रीनिवास खरे तर बॅकफूटवर राहिला होता. मात्र, पहिल्या दोन फेऱ्यातील अचूकता त्याच्या मदतीला आली. तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत जरूर तो मागे राहिला. अंतिम फेरीत त्याने ती मरगळ झटकून टाकली आणि स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी करताना विक्रमी ४ दोषांक राखत त्याने रियाझवर मात केली. श्रीनिवासने अंतिम लढतीत १ व्हाईट आणि चार ब्लॅक स्लॅमची नोंद करताना रियाझला संधीच दिली नाही. रियाझने व्हाईट स्लॅम नोंदविला. पण, त्याला श्रीनिवासच्या अचूकतेचा सामना करता आला नाही. श्रीनिवासने ४-२७ अशा दोषांकांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. हा फरकच त्याच्या खेळातील अचूकता दाखवून देणारा ठरला.
महिला विभागात दोनवेळच्या माजी जगज्जेती रश्मी कुमारीला आपल्या खेळात सातत्य राखता आले नाही. त्यापेक्षा ती संयम राखू शकली नाही असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. कमालीचा संथ आणि तेवढाच संयमी खेळ करून नाग ज्योतीने आपल्या आदर्श खेळाडू रश्मीवर मात केली. आठ बोर्डच्या फेरीत सुरवातीला चौथ्या बोर्डपर्यंत रश्मी १८-२४ अशी ८ दोषांकाची आघाडी राखून होती. पाचव्या बोर्डला नाग ज्योतीने व्हाईट स्लॅम नोंदविताना १९-२१ अशी पिछाडी भरून काढली. मात्र, या आघाडीचा फायदा रश्मीला उचलता आला नाही. सहाव्या बोर्डला नाग ज्योतीने २४-२५ अशी पिछाडी भरून काढली. एका गुणाच्या आघाडीने सातव्या बोर्डला उतरलेल्या रश्मीला आपल्या खेळात सातत्य राखता आले नाही. या बोर्डला रश्मीने ७, तर नाग ज्योतीने दोनच संधी घेतल्या. यामुळे नाग ज्योती ३१-२७ अशी ४ दोषांकाने आघाडीवर गेली. आठव्या बोर्डलाही रश्मीला करामत दाखवता आली नाही. ज्योतीने आपला संयम कायम ठेवत या बोर्डलाही बाजी मारून ३९-३२ अशा सात दोषांकाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
पुरुष विभागात प्रशांत मोरे, तर महिला विभागात एस. अपूर्वा तिसऱ्या स्थानावर राहिले. या संपूर्ण स्पर्धेत ४ अल्टिमेट, २२ व्हाईट आणि ७५ ब्लॅक स्लॅम नोंदविले गेले. अन्य पारितोषिकांमध्ये अमेरिका/कॅनडा मधून कॅनडाच्या लुई फर्नांडिस, युरोपमधील नेदरलॅंडसच्या चामिल कुरे आणि आशियातून श्रीलंकेची रोशिता जोसेफ यांची निवड करण्यात आली. सर्वोत्तम अल्टिमेट स्लॅमसाठी के. श्रीनिवास, व्हाईट स्लॅमसाठी संदीप देवरुखकर, ब्लॅक स्लॅमसाठी एस. अपूर्वा हिची निवड करण्यात आली.
Share