पुणे
मुळशी तालुक्यात दुग्ध व्यवसायिकांना मास्क, रेनकोट वाटप

हिंजवडी : मुळशीतील कोरोना महामारीच्या नाजूक परिस्थितीतही जिवाची पर्वा न करता घरोघरी दुध पोहचवणाऱ्या ग्रामीण भागातील दुग्धव्यवसायिकांचा (गवळींचा) अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला. आयटीपार्क येथील यशराज पारखी सोशल रिस्पॉन्सबिलिटी फाउंडेशन कडून गवळ्यांना मास्क, रेनकोट तसेच कोरोना योद्धा प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
घोटावडे, माण, हिंजवडी, मारूंजी, नेरे, कासरसाई परिसरात अनेक शेतकरी आजही शेतीला पुरक धंदा म्हणून दुग्धव्यवसाय करत आहेत. दुभत्या जणावरांचा कष्टाने संभाळ करत शहर आणि उपनगरात घरोघरी ठरलेल्या ग्राहकांना नित्यनेमाने दुध पुरवठा करत असतात. यासाठी परिसरातील अनेक गवळी आजही सायकल आणि दुचाकीचा वापर करत आहेत, वाड्या वस्त्यांवरून शेकडो लिटर दुधाने भरलेले कँड बांधून मोठ्या हिंमतीने ठरलेल्या वेळेत ग्राहकांना घरोघरी दुध पोहोच करतात. अगदी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या संचारबंदी काळातही अत्यावश्यक सेवेत समावेश होत असल्यामुळे जिवाची बाजी लाऊन पुणे, पिंपरी चिंचवड तसेच आयटीपार्क परिसरात मोठ्या हिंमतीने अनेक गवळी (दुग्धव्यवसाईक) नागरिकांना दुधपुरवठा करत आहेत. त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी फाऊंडेशनच्या वतीने आयटीपार्क येथे त्यांना मास्क, रेनकोट आणि कोरोना योद्धा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला असे फाऊंडेशचे यशराज पारखी यांनी सांगितले.
Share