
मुळशीत पावसाअभावी भात पिकांची लागवड रखडल्याने भात उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. यावर्षी भात पेरणीच्या वेळी वेळेवर पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग आनंदित झाला. त्यानंतरही अधून मधून पाऊस पडत गेल्याने भात रोपे चांगल्या प्रकारे तरारून आली. परंतु भात लागवडीच्या वेळीच पावसाने सध्या दडी मारलेली आहे. त्यामुळे भात लागवडीचा हंगाम अडचणीत सापडल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने भाताची पेरणी वेळेवर झाली होती. भात रोपे तयार असूनही सध्या बळीराजाला भात लागवडीसाठी पावसाची प्रतीक्षा आहे. गेली पंधरा दिवस मुळशी तालुक्यात पावसाने दडी मारल्याने भात उत्पादक शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. लागवडीसाठी रोपे तयार असतानाही पाऊसच नसल्याने तालुक्यात भात लागवडीला उशीर होताना दिसत आहे. काही शेतकऱ्यांनी नदी व तलावातील पाण्याचा वापर करून भात लागवडीला सुरुवात केली असली तरी बहुतांशी शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था नसल्याने भात लागवडीला उशीर होत आहे त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
फोटो ओळ – आसदे ता.मुळशी येथे नदीच्या पाण्याचा वापर करुन सुरू असलेली भात लागवड
Share