
पुणे ः हिंजवडीतील आय स्केअर आय टी या महाविद्यालयाच्या आवारात सुरू केलेल्या कोव्हिड विलगीकरण कक्षात मुळशीतील दहापेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण अंधार्या खोलीत उपचाराच्या प्रतिक्षेत आहेत. कोणी हॉस्पिटल देता का हॉस्पिटल अशी वेळ या बाधित रूग्णांवर आली आहे. ना डॉक्टर, ना सफाई कर्मचारी अश्या स्थितीत या रूग्णाचे हाल सुरू असून पीपीई कीट ना घालता स्थानिक आरोग्य प्रशासनाचे कर्मचारी या रूग्णांची तुटपुंजी देखभाल करीत आहेत.
याच विलगीकरण कक्षापासून हाकेच्या अंतरावरील विप्रो लिमिटेड कंपनीने बांधलेले व सुसज्ज कोव्हिड रूग्णालय असा गाजाबाजा करीत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उद्घाटन केलेले विप्रो हॉस्पिटल गेल्या चार आठवड्यापासून डॉक्टर व कर्मचारी नसल्याने धूळ खात पडून आहे. विप्रोने हे रुग्णालय जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात दिले आहे. मात्र जिल्हा प्रशासन व पीएम आरडीए च्या भोंगळ कारभारामुळे हे अध्याप सुरू झालेले नाही.
सध्या पुण्याजवळील मुळशी तालुक्यातही कोरोनाने थैमान घातले असून शासकीय चाचणीव्दारे पॉझिटिव्ह असलेल्या 10 पेक्षा अधिक रूग्णांना आयस्केअर आय टी च्या कोव्हिड विलगीकरण कक्षात मुळशी तालुका आरोग्य विभागाने ठेवले आहे. मात्र तिथे सुसज्ज डॉक्टर व आरोग्य यंत्रणा नसल्याने आज दिवसभर या बाधित रुग्णांवर उपचार सुरू झालेच नाहीत.
या कोव्हिड विलगीकरण कक्षात आज नवे पाच रूग्ण दुपारी शासकीय यंत्रणेकडून दाखल करण्यात आले. या रूग्णाना ना दुपारचे जेवण मिळाले ना संध्याकाळचा चहा. रात्री ऊशिरा या रूग्णाना जेवण देण्यात आले तेही अंधार्या खोलीत. दुपारपासून कोणीही डॉक्टर त्याच्याकडे फिरकला नाही, रात्री 9 वाजता यातील रूग्णाना कोणतेही संरक्षक पीपीई कीट ना घालता एका कर्मचार्याने केवळ गोळ्या दिल्या. आय स्केअर आय टी कंपनीच्या कोव्हिड विलगीकरण कक्षतील दुसर्या मजल्यावर अंधार्या खोलीतच या रूग्णाना कोरोनाशी मुकाबला करायचा आहे असा निर्धार करीत या रूग्णानी झोपणे पसंत केले.
याच विलगीकरण कक्षेच्या वेशीवर असणार्या मुळशी तालुक्यातीलच सूसजवळील सिम्बायोसिस रूग्णालयात पुणे महानगर पालिका हद्दीतील कोरोना रूग्ण मोफत उपचार घेत आहे. तर याच कक्षाच्या जवळील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील रूग्ण चांगल्या सुविधेत उपचार घेत आहे. ही दोन्ही उपचार केंद्र मुळशी तालुक्यात असतानाही केवळ ग्रामीण भाग असल्याने मुळशीतील रूग्णांवर डॉक्टर अभावी अंधारात उपचार घेण्याची दुदैवी वेळ आली आहे. त्यामुळे मुळशीकरांना वाली कोण असा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे .
Share