“करोनामुळे २०२० चं शैक्षणिक वर्ष वाया गेलं”; केनिया सरकारनेच केली घोषणा, थेट २०२१ मध्ये उघडणार शाळा

भारतामध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायची की नाही यासंदर्भात मतभेद असतानाच केनियाने थेट संपूर्ण शैक्षणिक वर्षच वाया गेल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे आता या देशातील विद्यार्थ्यांना थेट २०२१ मध्ये जानेवारी महिन्यात शाळेत आणि महाविद्यालयांमध्ये जाता येणार आहे. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आलं आहे.
जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला असून संपूर्ण जग या विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी लढताना दिसत आहे. मागील तीन ते चार महिन्यांमध्ये अनेक देशांनी वेळोवेळी लॉकडाउनचा कालावधी वाढवत नागरिकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिलं आहे. मात्र असं असतानाच आता काही देशांमध्ये करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर तेथील एक एक सेवा हळू हळू सुरु करण्यात आली आहे. मात्र अनेक देशांनी अद्याप शाळांसंदर्भातील निर्णय घेतलेले नाही. मात्र केनिया सरकराने शाळांसदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. यावर्षी करोनाच्या साथीमुळे वर्ग भरवण्यात येणार नसून २०२० हे संपूर्ण शैक्षणिक वर्षच करोनामुळे वाया गेलं असल्याची घोषणा सरकारने केली आहे. यासंदर्भातील वृत्त एपी या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे २०२१ पर्यंत केनियामधील सर्व शाळा बंद राहणार आहेत. सर्व शाळा आणि अंतिम वर्षांच्या परिक्षा या जानेवारीनंतरच घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. सामान्यपणे अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये घेतल्या जातात. देशाचे शिक्षण मंत्री जॉर्ज मागोहा यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये देशातील करोनाचा वाढता आलेख हा डिसेंबरमध्येच खाली जाणार असल्याचे सांगण्यात येत असल्याचे सरकराने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे २०२० मध्ये देशभरात कोणतेही प्राथमिक, माध्यमिक वर्षांच्या परीक्षा घेतल्या जाणार नाही. हे वर्ष करोनामुळे वाया गेलं असं समजण्यात येईल असंही या पत्रकामध्ये म्हटलं आहे.