
रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोना व्हायरसवर लस बनवली आहे. सेचेनोव्ह विद्यापीठाने स्वयंसेवकांवरील या लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्याचे म्हटले आहे
चाचणी परीक्षणात ही लस यशस्वी ठरल्याचा विद्यापीठाचा दावा आहे. स्वयंसेवकांच्या पहिल्या गटाला बुधवारी डिस्चार्ज देण्यात येईल. दुसऱ्या गटाला २० जुलैला डिस्चार्ज देण्यात येणार आहे असे वादिम तारासोव्ह यांनी सांगितले. ते इंस्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक आहेत. एएनआयने हे वृत्त दिले आहे.
रशियाच्या गेमली इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने १८ जून रोजीच सुरु केल्या होत्या.
“करोना व्हायरसविरोधात बनवण्यात आलेल्या जगातील पहिल्या लसीच्या स्वयंसेवकांवरील चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत” असे तारासोव्ह यांनी सांगितले.
रशियन विद्यापीठाचा हा दावा खरा ठरला तर करोना व्हायरसला रोखणारी जगातील पहिली लस ठरेल.
सध्या अमेरिका, चीन, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन या देशांमध्ये करोना रोखणारी लस विकसित करण्यासाठी मोठया प्रमाणावर संशोधन सुरु असून त्यांच्यात स्पर्धा सुद्धा आहे.
मानवी शरीरासाठी ही लस सुरक्षित आहे हाच या चाचणीमागचा हेतू आणि तो साध्य झाला आहे असे अलेक्झँडर लुकाशेव यांनी सांगितले. करोना विरोधात वापरण्यासाठी ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे असे लुकाशेव यांनी स्पुटनिकला सांगितले.
अमेरिका करोनावर लसीसह औषधही बनवत आहे. COVID-19 अँटीबॉडी उपचारासाठी अमेरिका न्यूयॉर्कस्थित रिजेनीरॉन कंपनीला ४५ कोटी डॉलर्सचा निधी देणार आहे.
अमेरिकेने लस निर्मितीसाठी नोव्हाव्हॅक्सला ऑक्सफर्ड विद्यापीठापेक्षा जास्त रक्कम दिली आहे. ऑक्सफर्डला १.२ अब्ज डॉलर दिले आहेत
ब्राझीलने ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनेकाने बनवलेल्या लसीच्या मानवी चाचण्या करायला परवानगी दिली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत सर्व डाटा उपलब्ध असेल. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत ही लस उपयुक्त आहे की, नाही ते स्पष्ट होईल. ब्राझीलला करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे.
करोना व्हायरसमुळे जपानमध्ये होणारी नियोजित ऑलिंपिक स्पर्धा सुद्धा पुढे ढकलावी लागली आहे. तिथे सुद्धा दिवसरात्र करोना व्हायरसविरोधात लस निर्मितीवर संशोधन सुरु आहे. जपानचा २०२१ सालच्या पहिल्या सहा महिन्यात आपल्या जनतेसाठी लस उपब्ध करण्याचा प्रयत्न आहे. जपानमध्येच बनवण्यात आलेले फॅव्हीपीरावीर हे औषध करोनावर प्रभावी ठरत आहे. जपानने हे औषध दुसऱ्या देशांनाही उपलब्ध करुन दिले आहे.
सिंगापूरमधल्या शास्त्रज्ञांनी सुद्धा करोना व्हायरसवर लस विकसित करण्याच्या कार्यक्रमाला गती दिली आहे. पुढच्या महिन्यात सिंगापूरमध्ये करोना विरोधात बनवण्यात आलेल्या लसीच्या मानवी चाचण्या सुरु होतील अशी अपेक्षा आहे. अमेरिकेतील मोडर्ना कंपनीच्या धर्तीवर सिंगापूरने ही लस विकसित केली आहे.
चीनमध्ये करोना लसीच्या पाच नमुन्यांवर चाचण्या सुरु आहेत. करोना व्हायरस या आजाराची सुरुवातच चीनमधून झाली आहे. त्यामुळे या आजारावर लस शोधण्यासाठी तिथे मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे.
चीनमध्ये सिनोवॅक बायोटेक या लसीची सर्वात जास्त चर्चा आहे.
भारतानेही करोना व्हायरसवर दोन लस विकसित केल्या आहेत. या लसी सध्या चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत.