महाराष्ट्रराजकीय
Trending

राजभवनात करोनाचा शिरकाव; १६ कर्मचाऱ्यांना लागण; राज्यपाल क्वॉरंटाइन

मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता राजभवनातही करोनाच शिरकाव झाला आहे. राजभवनातील १६ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे.  त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे.

मुंबई: राजभवनातही करोनाचा शिरकाव झाला आहे. राजभवनातील एक-दोन नव्हे तर १६ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली असून अद्याप ५७ जणांचे रिपोर्ट यायचे बाकी आहेत. राजभवनात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी क्वॉरंटाइन झाले आहेत.

राजभवनात एका इलेक्ट्रिशियनला खोकला आणि ताप आला होता. त्यामुळे त्याची टेस्ट केल्यानंतर त्याला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राजभवनातील १०० कर्मचाऱ्यांची कोविड टेस्ट करण्यात आली. त्यात १६ जणांना करोनाची लागण झाल्याचं निदान झालं आहे. तर ५७ कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट अजून यायचे बाकी आहेत. एकाच वेळी १६ कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी क्वॉरंटाइन झाले आहेत. त्यांचीही करोना टेस्ट करण्यात येणार असून राजभवनाचनं सॅनिटाइझेशन करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, काल राज्यात दिवसभरात करोनाचे तब्बल ८१३९ रुग्ण वाढले असून त्याचवेळी राज्यात काल आणखी २२३ जणांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्यातील करोना बाधितांची संख्या अडीच लाखाच्या जवळ पोहचली आहे. काल रुग्णसंख्येत ८१३९ रुग्णांची भर पडल्याने एकूण आकडा २ लाख ४६ हजार ६०० इतकी झाला आहे. दुसरीकडे मृतांचा आकडा १० हजारपार गेला आहे. कालचा मृतांचा २२३ हा आकडा धरून आतापर्यंत करोना साथीत राज्यात १० हजार ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वच आकडे देशातील सर्वाधिक आकडे असून राज्याची चिंता वाढवणारे आहेत.

त्याशिवाय राज्यात काल ४३६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ३६ हजार ९८५ झाली आहे. काल करोनाच्या ८१३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९९ हजार २०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख ८५ हजार ९९१ नमुन्यांपैकी २ लाख ४६ हजार ६०० नमुने पॉझिटिव्ह (१९.१७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८० हजार १७ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ३७६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close