महाराष्ट्रराजकीय
Trending

पुढच्या निवडणुका सुद्धा एकत्र लढवू; शरद पवार यांचे सुतोवाच

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन सहा महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लोटला आहे. या काळात अधूनमधून सरकार अस्थिरतेच्या चर्चांचे पेव फुटले होते. त्याचबरोबर इतरही राज्यात सत्तांतर झाली. या राजकीय पार्श्वभूमीवर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांना राज्यातील सरकारच्या भवितव्याविषयी प्रश्न उपस्थित केला. त्याला पवार यांनी उत्तर दिलं.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची विशेष मुलाखत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली. या मुलाखतीचा अखेरचा भाग आज प्रसिद्ध झाला. या भागात शरद पवार यांनी राजकीय विषयांवर प्रामुख्यानं भाष्य केलं. “ठाकरे सरकारचं भविष्य काय?”, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. त्यावर “हे सरकार पाच वर्षे चालेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि अशी व्यवस्थित आम्ही काळजी घेतली तर पुढच्या निवडणुका सुद्धा एकत्र लढवू,” असं सुतोवाच शरद पवार यांनी यावेळी बोलताना दिले.

शरद पवार म्हणाले, “विरोधी पक्षाचं म्हणजे एकतर विधान परिषदेतील विरोधी पक्षाची संपूर्ण टीम आहे. ती आपल्यासंबंधीच्या जबाबदारीचा इमॅक्ट करायला फार यशस्वीरित्या मला दिसत नाही. विधानसभेचं चित्र आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देखील सगळीकडे फिरताहेत. प्रश्न समजून घेण्याचा करताहेत. विरोधी पक्षाचं हे काम आहे, बोलणं, टीका टिप्पणी करणं. सत्ताधारी पक्षाची धोरणं कुठे चुकत असतील, तर त्याच्याबद्दल त्यांचा बोलायचा अधिकार आहे. आणि तो लोकशाही ज्यांना मान्य आहे, त्यांनी मान्यच केला पाहिजे. पण, त्याच्यामध्ये आकस आहे, असं दिसता कामा नये. आज काय या ठिकाणी दिसतंय की, एकेकाळी आजचे मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष आणि विरोधी पक्षात असलेले लोक हे एकत्रित काम करणारे होते. आज एकत्रितपणे काम करण्याची भूमिका आजच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने घेतली नाही. त्यामुळे आपल्या हातातील सत्ता गेली. याचं वैषम्य आणि अस्वस्थता ही विरोधी पक्षनेत्यांची अजिबात गेलेली दिसत नाही.

सत्ता येते आणि जाते. पण, लोकांनी दिलेली जबाबदारी समर्थपणानं पार पाडायची असते. ज्यावेळेला सत्ता गेल्याच्या नंतर मी सुद्धा मुख्यमंत्री होतो. माझं मुख्यमंत्रिपद ८० साली गेलं. त्यानंतर मी विरोधी पक्षाचा नेता झालो. पण व्यक्तिगत माझा अनुभव असा आहे, मला विरोधी पक्षाचा नेता म्हणून काम करण्यात अधिक गंमत येत होती. त्याचं एक समाधान होतं. पण आज काय दिसतंय की, विरोधी पक्षनेता असं म्हणत असेल की, मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीपद माझं गेलं. ते स्वीकायला मला वेळ लागला. म्हणजे सत्तेशिवाय मी चालू शकत नाही. जे प्रश्न लोक विचारतात, त्याला आम्ही सांगू शकत नाही. असंच अप्रत्यक्षपणे व्यक्त करण्यासारखं आहे म्हणून मला स्वतःला असं वाटत की, विरोधी पक्षाच्या नेत्यानं आपण स्वतः सत्ता हा आपला रस्ता नाही. आपण कधीकाळी होतो, आज त्याचा यत्किंचितही विचार करायचं कारण नाही. आज आपण विरोधी पक्षाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी लोकांनी आपल्यावर दिलेली आहे, ती आपण समर्थपणानं पार पाडली पाहिजे. ती पार पाडण्यासाठी पडेल ते कष्ट केले पाहिजे. त्यासाठी सत्ता माझ्याकडे नाही, सत्ता माझ्याकडे नाही. मला डायजेस्ट करता येत नाही, विसरता येत नाही. ही भूमिका हे चांगलं नाही,” असा चिमटा काढत पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close