देशविदेश
Trending

रशियातील कोरोना लस सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यता

रशियातील एका विद्यापीठानं करोनावरील पहिली लस यशस्वीरित्या विकसित केल्याचा दावा केला होता. दरम्यान, ही लस छोट्या प्रमाणात करण्यात आलेल्या मानवी चाचणीदरम्यान यशस्वी ठरली असून ती माणसांसाठी सुरक्षित असल्याचंदेखील विद्यापीठानं म्हटलं होतं. मॉस्कोच्या सेचेनोव्ह विद्यापीठानं ३८ स्वयंसेवकांवर यशस्वीरित्या ही चाचणी केली. त्याचबरोबर, रशियन सैन्यानेदेखील सरकारी गेमलेई राष्ट्रीय संशोधन केंद्रात दोन महिन्यांत समांतर चाचण्या पूर्ण केल्या. ही लस सर्वांसाठी ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

१२ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान ही लस ‘सिव्हिल सर्कुलेशन’मध्ये असेल अशी अपेक्षा असल्याचं मत गॅमलेई सेंटरचे प्रमुख अलेक्झांडर गिंटझबर्ग यांनी सरकारी वृत्तसंस्था ‘टास’शी बोलतानं सांगितलं. अलेक्झांडर यांच्या म्हणण्यानुसार सप्टेंबरपासून खासगी कंपन्या या लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करणार आहेत.

गेमलई संशोधन केंद्राच्या प्रमुखांच्या मते ही लस मानवी चाचणीत पूर्णपणे सुरक्षित ठरली आहे. ऑगस्टमध्ये जेव्हा ही लस उपलब्ध केली जाणार आहे तेव्हा ती तिसऱ्या टप्प्यातील चाचणीप्रमाणे असेल. कारण ज्यांना ही लस दिली जाईल त्यांच्यावर देखरेख ठेवली जाणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात लस किंवा औषधाची चाचणी केली जाते आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात त्यांची चाचणी होते. या लसीची १८ जून रोजी चाचणी सुरू करण्यात आली होती. सुरूवातील ९ स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली. त्यानंतर आणखी ९ जणांना ही लस देण्यात आली. कोणत्याही स्वयंसेवकावर याचे दुष्परिणाम दिसले नाहीत. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

सेचेनोव्ह विद्यापीठातील स्वयंसेवकांच्या दोन ग्रुपना पुढील बुधवारी सुट्टी देण्यात येणार आहे. त्यांना २३ जून रोजी लस देण्यात आली होती. सध्या त्यांना २८ दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. १८ ते ६५ वर्षांदरम्यान वय असलेल्या या स्वयंसेवकांना पुढील सहा महिन्यांसाठी देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रोटोकॉलनुसार कोणत्याही लसीची अथवा औषधाची मोठ्य़ा प्रमाणात उत्पादन होण्यापूर्वी तीन टप्प्यांत चाचणी होणं आवश्यक आहे

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close