ताज्या बातम्या
Trending

उद्यापासून सुर्यास्तानंतर साध्या डोळयाने धूमकेतूच दर्शन

डॉ राजेंद्र भस्मे, कोल्हापूर

अंतराळाच्या दुनियेत ज्याना रस आहे, त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. 15 जुलैपासून भारताच्या आकाशात सी/2020 एफ-3 नावाचा एक अनोखा धूमकेतू तब्बल 20 दिवस पाहता येऊ शकतो. हा धूमकेतू 15 जुलैपासून सुर्यास्तानंतर रोज 20 मिनिटांपर्यंत लोक पाहू शकतील. या अनोख्या धूमकेतूला NEOWISE, असे नावही देण्यात आले आहे.पण पश्चिम महाराष्ट्रात असणार्या पावसाळ्यामुळे शक्य होईल का हीच खगोल प्रेमींना आशंका आहे पण येत्या पंधरवड्यात सायंकाळी ढग नसण्याची वाट पहावी लागेल
टेलीस्कोपच्या सहाय्याने मार्चमध्येच हा धूमकेतू शोधण्यात आला होता. शक्यता आहे, की हा धूमकेतू 22-23 जुलैला पृथ्वीच्या अगदी जवळ असेल. एवढेच नाही, तर तो पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला वायव्येकडील आकाशात दिसेल.
गेले काही महिने एक आगंतुक पाहुणा आपल्या सूर्यमालेत प्रवेशला आहे. ‘नासा’च्या “निओवाईज’ या अधोरक्त किरणांच्या दुर्बिणीने त्याला खूप दूरवर असतानाच 27 मार्च 2020 रोजी हेरला आणि त्याच नामकरण सुद्धा केलं. सी/ 2020 एफ3 याला कॉमेट निओवाईज (Neowise) म्हणूनही ओळखतात.
‘ हा धूमकेतू 15जुलैपासून संध्याकाळी वायव्य दिशेला क्षितिजावर सप्तर्षी या तारका समूहात दिसणार आहे. तो दररोज क्षितिजापासून थोडा थोडा वरती, सप्तर्षीकडे सरकताना दिसेल. 23 जुलै रोजी तो पृथ्वीच्या निकट सुमारे 10 कोटी किमी अंतरावर असेल. यापुढे 20 दिवस याचे दर्शन घडेल मात्र तो क्षितिजावर असलेने सुर्यस्तानंतर फक्त 20-25 मिनिटेच तो दिसेल. याच्या केंद्रकाचा व्यास पाच किमी आहे.
मात्र त्याला कोट्यवधी किलोमीटरची शेपटी फुटल्यामुळे तो एखाद्या पुच्छल ताऱ्यासारखा, कुंचल्यासारखा दिसेल. त्याची दृश्‍यप्रत मॅग्निट्यूड एक असल्याने केवळ डोळ्यांनी तो पहिल्या प्रतीच्या ताऱ्याप्रमाणे ठळक दिसेल. हा धूमकेतू पाहण्यासाठी उपकरणांची आवश्‍यकता नाही. पण बायनोकुलर / दुर्बिणीतून पाहिल्यास विलोभनीय नजरा या अनुभवता येईल. 1997 साली हॅले बॉपचा धूमकेतू ठळक दिसला होता. त्यानंतर तसाच तेजस्वी धूमकेतू पाहण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे. याची कक्षा प्रदीर्घ-लंब-वर्तुळाकार असलेने हा 6766 वर्षांनी पुन्हा सूर्याच्या भेटीसाठी येईल.
सूर्य, पृथ्वी अंतराच्या लाखोपट दूरवर अंतराळात oort cloud नावाचा सूर्यमालेला लपेटलेला ढग आहे. त्यामध्ये बर्फ, धूळ आणि कार्बनडाय ऑक्‍साईड वायूचे असंख्य गोळे फिरत असतात. त्यातील एखादा गोळा वाट चुकून सूर्याच्या गुरुत्वाकर्षणात सापडतो आणि त्याला प्रदक्षिणा घालू लागतो. तो जेव्हा सूर्याच्या सानिध्यात येतो तेव्हा सौर वातामुळे त्यास शेपटी फुटते. तेव्हा हा पाहुणा एखाद्या पुच्छल ताऱ्यासारखा दिसू लागतो.
आजपासून आकाशात गुरू ग्रहाची प्रतियुती घडत आहे. त्यामुळे गुरुचे दर्शन आता रात्रभर होईल शिवाय त्याचा आकार नेहमी पेक्षा मोठा आणि तेज वाढलेले दिसेल. सूर्य मावळला की पूर्वक्षितिजावर गुरुचा उदय होईल. एक एक करत शनी, नेपच्युन, मंगळ, युरेनस, शुक्र, बुध असे सर्व ग्रह पहाटे पाचपर्यंत आकाशात दाखल होतील. असा हा खगोलीय ग्रहगोलांचा दुर्लभ नजरा सध्या पहाटे दिसतो आहे

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close