पुणे
Trending

पुण्यात लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांना समज देण्यासाठी अवतरले ‘यमराज’

पुणेकरांनो घरीच बसा, अन्यथा माझ्या सोबत यायला तयार रहा.. असा दिला इशारा.

पुणे शहरात मागील काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात दहा दिवसांच्या कडक लॉकडाउनची घोषणा करण्यात आली असून, सध्या लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून शहरातील चौकाचौकात व प्रत्येक रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त आहे. मात्र तरी देखील काही नागरिक कोणतीही कारणं पुढे करून विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. अशा नागरिकांना समज देण्यसाठी पुण्यातील स्वारगेट चौकात आज ‘यमराज’ अवतरल्याचे दिसून आले.

नागरिकांमध्ये लॉकडाउनच्या नियमांबद्दल प्रबोधन होण्याच्या दृष्टीने आज पुण्यातील स्वारगेट चौकात प्रतिकात्मक यमराज रेडा घेऊन अवतरले होते. तुम्ही घरात बसा, अन्यथा माझ्या सोबत यायला तयार रहा, असे यावेळी आवाहन त्यांच्याकडून आवाहन करण्यात आले. तसेच चौकात येणार्‍या दुचाकी आणि चार चाकी वाहन चालकांचे प्रबोधन देखील करण्यात आले.

यावेळी सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर म्हणाले की, पुणे शहरात दहा दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र काही नागरिक विनाकारण फिरताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज आपण प्रतिकात्मक यम आणि रेडा चौकात आणून अशा नागरिकांमध्ये प्रबोधन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून घरीच रहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी यमराजाचा वेश परिधान केलेले सुजय खरात म्हणाले की, करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर पुण्यात आढळून येत आहेत. आजवर पुणेकर नागरिकांनी नियमांचे पालन केले आहे. मात्र काही नागरिक नियम पाळत नाही. अशा नागरिकांसाठी मला रस्त्यावर उतरावे लागले आहे. यामुळे नागरिकांनी आपली आणि कुटुंबाच्या काळजीसाठी तरी घरी बसा, अन्यथा माझ्या सोबत येण्यास तयार रहावे, असे त्यांनी सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close