जगाच्या पाठीवरपुणे
Trending

पुण्यात घडली देशातील दुर्मिळ घटना; गर्भातच बाळाला झाली करोनाची लागण

करोना महामारीचं थैमान देशात आणि जगात सुरू असतानाच एक महत्त्वाची आणि दुर्मिळ घटना पुण्यात घडली आहे. बाळाला आईच्या गर्भात असतानाच करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ही देशातील पहिलीच घटना आहे. यापूर्वी बाळाला प्रसुतीनंतर करोनाचा संसर्ग झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, गर्भात असतानाच करोनाचा संसर्ग झाल्याची ही देशातील पहिली घटना असल्याचं ससूनच्या अधिष्ठातांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

“पुण्यातील ससून रुग्णालयात हडपसर परिसरात राहणारी एक २२ वर्षीय गर्भवती महिला दाखल झाली होती. प्रसुतीच्या एक दिवस अगोदर ताप आल्यानं ती मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णालयात भरती झाली होती. महिलेची आरटी-पीसीआरद्वारे करोना चाचणी करण्यात आली. चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर अॅण्टीबॉडी टेस्ट करण्यात आली, त्यात महिलेला करोना असल्याचं निदान झालं होतं,” अशी माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोगशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. आरती किणीकर यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली. “बाळाला अनेक लक्षण दिसून आली होती आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले, हे सगळं खूप आव्हानात्मक होतं,” असंही त्या म्हणाल्या.

“बाळाचा जन्म झाल्यानंतर नाकातील स्वॅब घेण्यात आला. त्याचबरोबर नाळ आणि नाभीच्या तपासणीनंतर तिला करोना झाल्याचं निष्पन्न झालं. बाळाची आरटी-पीसीआरद्वारे करोना चाचणी करण्यात आली होती. बाळाला २४ ते ४८ तासाच्या आतच लक्षणं दिसून आली. तापासह करोनाची अनेक लक्षणं बाळामध्ये दिसून आली. बाळाची नाभी आणि नाळातील संसर्ग ओळखण्यास सक्षम होतो. आईलाही संसर्ग झालेला होता, मात्र त्याची काही लक्षणं दिसत नव्हती,” असं किणीकर म्हणाल्या. “या केस संदर्भातील आमचा रिसर्च पेपर प्रकाशित करण्यासाठी अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय जर्नलकडे पाठवला होता. तो स्वीकारण्यात आला आहे. त्याचं स्वीकृती पत्रही काल रात्री आम्हाला मिळालं आहे,” अशी माहिती किणीकर यांनी दिली.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close