
अभिनेता सुव्रत जोशी सध्या लंडनमध्ये असून तिथूनच ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ या मालिकेसाठी शूटिंग करत आहे. अभिनेत्री व पत्नी सखी गोखलेसोबत तो लंडनमध्ये राहत आहे. सुव्रत नुकताच घरातील काही आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर गेला होता. त्यावेळी बाजारात एका चहा पावडरचं नाव वाचून त्याचा आश्चर्याचा धक्काच बसला.
इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्या चहा पावडरच्या पॅकेटचा फोटो पोस्ट करत सुव्रतने लिहिलं, ‘म्हणजे? काय? व्हॉट? कशासाठी??? अर्थ काय? विनोद आहे की धंदा बुडावयाचा आहे? मजा आहे? चहा प्यायचा? प्यायला कोण येतंय? काय होतंय?? याच्या वाफेनी काय होईल? ही चहापत्ती वापरून चहा विकला तर दुकानाचे नाव “अमृततुल्य” असेल की “विषतुल्य”? चहाचे कप सॅनिटायझेर नी धुवावे लागतील का? का? का? कसे???हे आणि अनेक प्रश्न माझ्या मनात उकळत आहेत,कुणी गाळून देईल का? ‘ सुव्रतच्या या फोटोवर नेटकरी भन्नाट कमेंट्स करत आहेत.
‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला सुव्रत सखीसोबत ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ या मालिकेत काम करत आहे. लंडनमध्ये घरीच मोबाइलवर या मालिकेसाठी ते शूटिंग करत आहेत.