पुणे
Trending

व्हाइट हाऊसबाहेर दिसणार राम मंदिराचे फोटो, टाइम्स स्क्वेअरवरील प्रभू रामांच्या प्रतिमेला मुस्लिमांचा विरोध

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडत असतानाच अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामधील टाइम्स स्क्वेअर प्रभू रामांची प्रतिमा झळवण्याचा मानस अपुराच राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. टाइम्स स्क्वेअरमधील बिलबोर्डची मालकी असणाऱ्या प्रमुख जाहिरातदार कंपनीने प्रभू रामांची प्रतिमा झळकवण्यासाठी नकार दिला आहे. मुस्लीम समाजातील काही जणांनी आक्षेप घेतल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र रात्री कॅपिटोल हिल आणि व्हाइट हाऊसबाहेर फिरत्या ट्रकमधून LED डिस्प्लेद्वारे भव्य श्री राम मंदिराचे फोटो प्रदर्शित केले जातील असे वॉशिंग्टन डीसीमधील भारतीय-अमेरिकन नागरिकांनी सांगितले. न्यू यॉर्कमध्येही राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा साजरा केला जाणार आहे. तिथे वेगवेगळे होर्डिंग्स भाडयावर घेतले असून त्यावर प्रभू रामचंद्र आणि अयोध्येतील भव्य राम मंदिराचे फोटो दाखवले जाणार आहेत.
अमेरिकेतील काही मुस्लीम समाजासंदर्भात काम करणाऱ्या गटांनी टाइम्स स्क्वेअरवर जाहिराती करणाऱ्या ब्रॅण्डेड साइट्स या कंपनीकडे ५ ऑगस्ट रोजी प्रभू रामांची प्रतिमा टाइम्स स्क्वेअरवर झळकवण्याचे कॅम्पेन करु नये अशी मागणी केली. या मागणीनंतरच कंपनीने कॅम्पेन करण्यास नकार दिला आहे. टाइम्स स्क्वेअरवरील नॅसडॅकची स्क्रीन ही काही विशेष दिवसांच्या निमित्ताने रोषणाई करुन सजवली जाते. त्यासाठी ही स्क्रीन भाड्याने दिली जाते. १७ हजार फूट आणि वर्तुळाकार अशा या एलईडी स्क्रीनवर  प्रभू रामांची प्रतिकृती झळकवली जाणार आहे. ही टाइम्स स्क्वेअरवरील सर्वात स्पष्ट आणि सर्वाधिक रेझोल्यूनश असणारी एलईडी स्क्रीन आहे. तसेच जगभरातील विशेष दिवसांचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या टाइम्स स्क्वेअरवर ही असल्याने तिला अधिक महत्व आहे. मात्र आता मुस्लीम समाजाने केलेल्या विरोधानंतर न्यूयॉर्कमधील अमेरिकन इंडियन पब्लिक अफेर कमिटीच्या वतीने नियोजित कॅम्पेन करता येणार नाही.
प्रभू रामांची प्रतिमा झळकवण्याला विरोध करणाऱ्या गटांपैकी एक असणाऱ्या आयएमनेट या गटाने अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. “आम्ही न्यूयॉर्कचे महापौर, शहर समिती, राज्यपाल, निवडून आलेले स्थानिक नेते आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हला विनंती करतो की त्यांनी उजव्या विचारसणीच्या हिंदू गटांना टाइम्स स्क्वेअरवरील बिलबोर्डवर जाहीरात करु देऊ नये,” असं म्हटलं होतं. या गटाचे अध्यक्ष असणाऱ्या डॉ. शेख उबाइड यांनी कंपनीने कॅम्पेन न करण्याच्या निर्णयासंदर्भात समाधान व्यक्त केलं आहे. “हा लोकप्रियतेचा, मानवी हक्काचा आणि कायद्याचा विजय आहे,” असं शेख म्हणाले.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close