पुणे
Trending

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कामाला गती येण्यासाठी त्रिस्तरीय समिती गठीत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे,:पुणे मेट्रो मार्गिका 3 हिंजवडी ते शिवाजीनगर कामकाजाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. मेट्रोचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व ‘पीएमआरडीए’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कामकाज करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
नागरिकांशी संवाद साधून मेट्रोचे काम जलदगतीने होण्यासाठी महापालिका व पीएमआरडीए मधील अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली. या समितीमध्ये माधव जगताप, नितीन उदास व सुनंदा गायकवाड यांचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो आणि पंचवटी, पाषाण ते पौड रोड भुयारी मार्गाच्या कामाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्किट हाऊस येथे आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर,  तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रोच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रकल्प निश्चिती, मान्यता, कामकाजाची सुरुवात, भूसंपादनाची सद्यस्थिती, केंद्र आणि राज्य शासनाची जागा, पर्यायी रस्ते तसेच अंमलबजावणीतील महत्वाचे टप्पे व प्रकल्प राबवण्यासाठी सुरु असलेल्या कार्यावाहीबाबतचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.
विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे यांनी याविषयी माहिती देऊन कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी नियोजन केल्याचे सांगितले.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close