
दुबईहून १९१ प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरल्याने शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत मुंबईतील वैमानिकासह १७ जणांचा मृत्यू, तर १२३ प्रवासी जखमी झाले. दरम्यान, या घटनेच्या तपासाचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिले. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो (AAIB) या घटनेचा तपास करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
“कोझिकोडमध्ये झालेल्या विमान उपघाताचं दु:ख झालं आहे. AXB-1344 हे विमान १९१ प्रवाशांसह दुबईवरून कोझीकोड या ठिकाणी येत होतं. पावसामुळे हे विमान धावपट्टीवरून घसरलं आणि विमानाचे तुकडे होण्यापूर्वी ते ३५ फुट खाली गेलं,” अशी माहिती हरदीपसिंह पुरी यांनी दिली. तसंच आपण स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून मुंबई, दिल्लीवरून मदतीसाठी टीम रवाना करण्यात आल्या आहेत. एआयबीद्वारे या घटनेचा तपास केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
नक्की काय घडलं होतं?
हे विमान रात्री ७.४१ वाजता कोझिकोडच्या करीपूर विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरले आणि खड्डय़ात कोसळले. हा अपघात एवढा भीषण होता की विमानाचे दोन तुकडे झाले. विमानाने उतरताना धावपट्टी सोडली आणि ते कुंपणाच्या भिंतीवर आदळून ३५ फुटी खड्डय़ात कोसळले. त्यामुळे त्याचे दोन तुकडे झाले, अशी माहिती नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) निवेदनाद्वारे दिली. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार बोइंग-७३७ हे विमान धावपट्टीवरू घसरल्याने हा अपघात झाला. विमान उतरताना त्यात आग लागली नव्हती, असे नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने स्पष्ट केले. या विमानात १७४ प्रवासी, दहा बालके, दोन वैमानिक आणि पाच कर्मचाऱ्यांचा समावेश होता, अशी माहिती हवाई वाहतूक मंत्रालयाने दिली.