राजकीय
Trending

अखेर सचिन पायलट यांचं बंड शमलं पक्षाच्या बळकटीसाठी काम, काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’

राजस्थान सरकारमध्ये भूकंप घडवत त्यांना धक्का देऊन बंडाचा झेंडा उभा करणारे सचिन पायलट यांची घरवापसी झाली आहे. ते काँग्रेसमध्येच राहणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्ष आणि सरकारला साथ देणार असंही त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्षातर्फे सचिन पायलट यांचं बंड शमल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. पीटीआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. आजच सचिन पायलट यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती.

राजस्थानात उद्भवलेल्या सत्ता संघर्षानंतर काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे गेहलोत-पायलट वादावर पडदा पडण्याबरोबरच राजस्थानातील सत्ता संघर्ष लवकरच मिटण्याची शक्यता होती. त्या अपेक्षेप्रमाणेच सचिन पायलट यांनी पक्षासाठी काम करण्याचं मान्य केलंय.

राजस्थानात सचिन पायलट हे राजकीय भूकंप घडवतील असं वाटत होतं. मात्र राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी केलेली शिष्टाई यशस्वी ठरली आहे. महिनाभराहून अधिक काळ सचिन पायलट यांनी राजस्थानमधलं राजकीय वातावरण अस्थिर ठेवलं. मात्र या सगळ्यामध्ये ‘काँग्रेसचं ठंडा करके खाओ’ हे धोरण कामी आलं आहे. त्यामुळेच बंडाचं झेंडा उगारत पक्षाला राम राम करणाऱ्या सचिन पायलट यांची घरवापसी झाली आहे. गेल्या महिनाभरापासून अधिक काळ हरयाणात डेरा टाकून बसलेले आमदार आता जयपूरला परतण्याच्या तयारीत आहेत. अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री केल्याने आणि सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री केलं गेल्याने सचिन पायलट चांगलेच नाराज झाले होते. त्यांनी बंडाचा झेंडा उगारत गेहलोत सरकार अस्थिर करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. मात्र काँग्रेसला राजस्थानचा गड राखण्यात यश आलंय कारण सचिन पायलट हे काँग्रेसमध्ये परतले आहेत.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close