महाराष्ट्र
Trending
पै.दिलीप नाना भरणे – दिलदार मित्र, कार्यकुशल उद्योजक
राष्ट्रीय कुस्तीगीर ते आंतरराष्ट्रीय उद्योजक

मुळशी तालुक्यातील माण गावी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पै.दिलीप भरणे यांचा जीवनप्रवास अक्षरशः थक्क करणारा आहे.माण-हिंजवडी परिसर आज जरी सधनतेने बहरला असला तरी त्याकाळी विकसनशील क्षेत्रात मोडत असायचा.शेती व शेतीला पुरक व्यवसाय हेच अर्थार्जनाचे एकमेव साधन.भरणे घराणे म्हणजे शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यात हिरीरीने भाग घेऊन अफजल खान बिमोड प्रकरणात शिवरायांच्या मागे ठाम उभे राहिलेले घराणे.याच घराण्यात नानांचा जन्म.साहजिकच पुरुषार्थ व पराक्रम रक्तातच होता.
दिलीप भरणे यांचे मामा पै.अनंता पाडाळे हे महाराष्ट्राचे तुफानी पैलवान.त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत दिलीप नाना भरणे कुस्ती क्षेत्रात उतरले.बालपणी शालेय जीवनात विविध स्पर्धेत भाग घेत,शेतकरी असल्याने रानात सुद्धा कुस्तीचाच सराव करताना पाहून मामा अनंता पाडाळे यांनी त्यांना कुस्तीच्या वरिष्ठ सरावासाठी नेले ते थेट कुस्तीपंढरी कोल्हापूरात.मोतीबाग तालमीत हिंदकेसरी अर्जुनवीर गणपतराव आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुस्तीचा सराव सुरू केला.दिसमासाने कुस्तीत नानांचा हातखंडा बसू लागला.विविध मैदानी कुस्ती मैदानात दिलीप नानांची विजयी आरोळी घुमू लागली.त्याकाळी पुण्यात गोकुळ वस्ताद तालमीत एक ऋषितुल्य वस्ताद आपल्या अंगीभूत प्रतिभेला आपल्या शिष्यांच्या माध्यमातून प्रकट करत होते व पुण्यातल्या भवानी पेठेतील गोकुळ वस्ताद तालमीत मल्लांचे नंदनवन त्यांनी फुलवले.ते वस्ताद म्हणजे रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार.दिलीप भरणे यांनी सुद्धा गोकुळ वस्ताद तालमीत प्रवेश घेतला.सतत 10 वर्षे त्यांनी गोकुळ वस्ताद तालमीत कुस्तीचा सराव केला
पै.दिलीप नाना भरणे यांनी त्यांच्या कुस्ती कारकिर्दीत केवळ मैदानी कुस्तीत आपला झेंडा रोवला नाही तर तब्बल 14 वेळा राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व केले.84 व 96 वजन गटात सलग 6 वेळा सुवर्णपदक जिंकले.भोर येथे झालेल्या महान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महान महाराष्ट्र केसरी किताब जिंकला.
गोकुळ वस्ताद तालमीविषयी बोलताना दिलीप भरणे म्हणाले की माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी काळ मला गोकुळ वस्ताद तालमीने दिला.देवासारखा गुरू मिळाला.असंख्य जिवाभावाचे मित्र भेटले.महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड व महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर हे माझ्या सख्ख्या भावाप्रमाणे मित्र आहेत.आजही आम्ही मैदानात गेलो तर शंकर अण्णा पुजारी आम्हाला राम-लक्ष्मणाची जोडी म्हणतात इतकी आमची घनिष्ठ मैत्री.
कुस्तीत मोठे नाव कमावले मात्र कुस्ती हा असा खेळ आहे ज्यात तुम्हाला कधी ना कधी दुखपतीचा सामना करावा लागतोच.सततच्या दुखापतीने दिलीप भरणे यांनी कुस्तीतून निवृत्ती घेतली.
तो काळ म्हणजे नुकतेच हिंजवडी आयटी पार्क होऊन तिथे IT कंपनी आपले मजबूत जाळे विणत होत्या.दिलीप नानांनी याच वेळी हिंजवडी येथे छोटासा व्यवसाय स्थापन केला.माथाडी सारखे काम स्वतः नानांनी सुद्धा केले व हळूहळू त्याचे ते मालक बनले.कष्ट करायची तयारी,निर्व्यसनी व्यक्तित्व आणि पैलवान असल्याने वाघासारखे धाडस या गुणामुळे दिलीप भरणे यांचा व्यवसायात जम बसू लागला.मनुष्यबळ पुरवठा करणे या व्यवसायात त्यांनी केवळ हिंजवडी नव्हे तर बघता बघता पुणे,कोल्हापूर,बेंगलोर सारख्या शहरात आपल्या व्यवसायाचे कार्यक्षेत्र विस्तारले.सध्या त्यांची DB फॅसिलिटीज नावाने प्रायव्हेट लिमिटेड कंपनी देश व देशाबाहेर विस्तारु पाहत आहे.किमान 5 हजार लोकांचा प्रचंड स्टाफ दिलीप नाना सांभाळतात.दिलीप नानांच्या कंपनीला नुकतेच ISO मानांकन मिळाले.हिंजवडी,बेंगलोर ठिकाणी स्वतःचे कार्पोरेट ऑफिस व व्हाईट कॉलर स्टाफ सेवा देत आहे.एकेकाळी माथाडी पासून सुरू झालेला नानांचा प्रवास आज कार्पोरेट क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी पर्यंत आला आहे.बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये त्यांनी सध्या लोहगाव विमानतळाच्या आधुनिकरणाचे काम हाती घेतले आहे.

त्यांच्या कारकिर्दीचा गौरव दुबई येथे “आदर्श युवा उद्योजक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.
दिलीप भरणे यांनी स्वतः शून्यातून प्रवास सुरू केला त्यामुळे तळागाळातील लोकांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे.माण हिंजवडी परिसरात दिलीप नानांचा अफाट लोकसंग्रह आहे.ज्या कुस्ती क्षेत्रातून ते इथवर आले त्याची उतराई म्हणून ते आजही अनेक कुस्ती मैदानाचे आयोजन नियोजन करतात.कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थेचे ते पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहतात.कुस्तीसाठी यापुढे भरीव योगदान द्यायचा त्यांचा मानस आहे.
मान चे ग्रामदैवत श्री मान देवी व श्रीकालभैरव यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे.आजही प्रतिवर्षी त्यांच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांचे मैदान ते आयोजित करतात.
नानांचे बंधू श्री सुनील भरणे व श्री दत्तात्रय भरणे यांचा ठाम पाठिंबा त्यांना आजवर लाभला त्यामुळे ते इथवर येऊ शकले.
प्रतिभावंत व्यक्तीच्या मागे ते सतत उभे असतात.एखादा व्यक्ती टॅलेंटेड असेल तर मग तो गरीब श्रीमंत,जात पात याकडे न पाहता त्याला साहाय्य करतात.नुकतेच त्यांनी सातारचे कलाकार ज्यांच्याकडे फॅब्रिकेशन ने कोणतीही वस्तू साकार करायची कला होती त्यांच्यासोबत तब्बल 15 खर्च करुन प्रतापगड ची भव्य प्रतिकृती निर्माण केली ज्याचा गाजावाजा महाराष्ट्रभर झाला.
असे एकाच उदाहरण नाही तर असंख्य उदाहरणे देता येतील जिथे नानांनी अश्या कलाकारांना नेहमीच नफा तोटा न पाहता प्रोत्साहन दिले.
असे माण गावचे भूषण महान महाराष्ट्र केसरी,कुस्ती मल्लविद्या महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष,आदर्श युवा उद्योजक पुरस्कार विजेते पै.दिलीप नाना भरणे यांची कारकीर्द समाजातील असंख्य तरुणांना प्रेरणादायक आहे.मनात आणाल तर जग जिंकू शकाल असा अप्रत्यक्ष संदेश त्यांच्या जिवनसंघर्षातून मिळतो.
Share