महाराष्ट्र
Trending

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावर पहिल्यांदाच शरद पवार यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर मला १०० टक्के विश्वास - शरद पवार

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. एका अभिनेत्याने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे. हे व्हायला नको होतं. पण ज्या पद्धतीने मीडियात चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“एका अभिनेत्याने आत्महत्या करणं दुर्दैवी आहे. पण मीडियात ज्या पद्धतीने चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटतं. माझ्या जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण मीडियाने त्याची नोंदही घेत नाही,” अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.

“महाराष्ट्र तसंच मुंबई पोलीस सक्षम आहेत. त्यांच्यावर मला १०० टक्के विश्वास आहे. पण तरीही सीबीआय किंवा इतर यंत्रणेने तपास करावा असं वाटत असेल तर मी त्याला विरोध करणार नाही. चौकशी कोणी करायची हा राज्य सरकार, सीबीआयचा प्रश्न आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी करण्यासंबंधी विचारण्यात आलं असता माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही असं त्यांनी म्हटलं. तसंच ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे का ? असं विचारण्यात आलं असता यामागे नेमका काय हेतू आहे हे मी सांगू शकत नाही असं ते म्हणाले.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close