राज ठाकरेंच्या मागणीला यश, जिम सुरु करण्यासंबंधी ठाकरे सरकारने घेतला निर्णय
दोन दिवसात जिम सुरु करण्यासंबंधी आदेश निघणार

ठाकरे सरकारने जिम सुरु करण्याचा निर्णय घेतला असून दोन दिवसात अधिकृत घोषणा केली जाणार आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे. सर्व अटी-शर्थींचं पालन करुन राज्यभरात जिम सुरु करण्यासाठी परवानगी दिली जाणार असल्याचं जय वडेट्टीवार यांनी टीव्ही ९ शी बोलताना सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील जिम सुरु करण्याची मागणी केली होती. तसंच भाजपा नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना जिम सुरु करण्यासंबंधी पत्र लिहिलं होतं.
“राज्यातील जिम सुरु करावी अशी अनेक दिवसांची मागणी होतीच. गेल्या चार महिन्यात जिम व्यावसाय अडचणीत होता. आरोग्याच्या दृष्टीनेही अनेकांच्या समस्या आहेत. म्हणून सरकारने जिम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांमध्ये या राज्यातील सर्व चालकांना नियमावलीचं पालन करत जिम सुरु करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.