पुण्यात गणपती मंडळांसाठी अशी आहे आचारसंहिता,
मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते १२८ वर्षांत प्रथमच बदल

पुणे शहर आणि परिसरात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. मुंबईला मागे टाकत पुणे राज्यातील करोना हॉटस्पट ठरला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्यावर भर द्यावा, आगमन व विसर्जन मिरवणूक काढू नयेत. असे आवाहनी यावेळी त्यांनी नागरिकांना केले आहे.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीमुळे २२ ऑगस्ट २०२० ते १ सप्टोबंर २०२० रोजी पर्यंत पुणे शहरात राज्या सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार गणेशोत्व सारजा होणार आहे. पुणे शहरातील करोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता काही कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार मागील सहा महिन्यात धार्मिक, सामाजिक व उद्योग व्यवहारात अनेक बंधने अंमलात आणली होती. परपरांना मुरड घालत वर्षानुवर्षे साजरे होणारे उत्सव आरोग्य विभागानं दिलेल्या निर्देशांप्रमाणे सादरे करावेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अशी आहे पोलिसांची आचारसंहिता
१) गणेश मूर्ती खरेदी
गणेश मूर्तीची खरेदी ऑनलाईन पद्धतीने करावी
यंदा स्टॉलला पदपथ, रस्त्यांवर परवानगी नाही
शाळांची पटांगणे, मोकळ्या जागांवर स्टॉलला परवानगी
२) श्री गणेश आगमनासाठी असणार असे नियम
आगमन व विसर्जन मिरवणूक काढू नये
आगमन व विसर्जनासाठी कमीत कमी नागरीकांची उपस्थिती असावी
३)श्री गणेश प्रतिष्ठापना करताना घ्या काळजी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरातच करावी
अनन्यसाधारण परिस्थितीत मनपाच्या नियम व अटींचे पालन करुनच छोट्या मंडपांना परवानगी
सार्वजनिक मंडळांसाठी श्रींच्या मूर्तीची मूर्तीची उंची चार फुट व घरगुती गणपतीसाठी दोन फुट असावी
४)श्री गणेश पूजा करताना असतील असे नियम
आरती व पुजेसाठी 5 व्यक्तींचे बंधन, बाहेरील व्यक्तींचा सहभाग असू नये
सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टंसींग अनिवार्य
५) गणेश दर्शन ऑनलाइनच!
दर्शनासाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक आदी माध्यमांचा वापर करावा
ऑनलाईन व्यवस्था नसल्यास छोटे व्हिडीओ बनवून पाठवावेत
दर्शनासाठी ऑनलाईन टोकन, डिजीटल पास द्यावा व सामाजिक अंतराचे पालन करावे
कोणत्याही निमंत्रीत किंवा व्हिआयपी व्यक्तींना दर्शनासाठी आमंत्रीत करू नये
६) खासगी सुरक्षा रक्षक २४ तास हजार असावेत
संशयित किंवा बेवारस वस्तू आढळून आल्यास ताबडतोब पोलिसांना खबर द्यावी. मौल्यवान दागिने असणाऱ्या मंडळांनी संरक्षणाची विशेष काळजी घ्यावी. श्रीच्या मूर्तीचे रक्षणाकरीता कमीत कमी पाच कार्यकर्ते अथवा खासगी सुरक्षा रक्षक 24 तास हजार असावेत
मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते १२८ वर्षांत प्रथमच बदल
करोनाच्या महासंकटामुळे यंदा पुण्यातील मानाच्या आणि प्रमुख मंडळांच्या गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा मान या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनाच देण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या १२८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच हा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी या मंडळांच्या गणपतींची प्रतिष्ठापना शहरातील मान्यवरांच्या हस्ते केली जात असे, अशी माहिती मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाचे अध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
गणेश मंडळाचे प्रमुख पदाधिकारी म्हणाले, “दरवर्षी समाजातील विविध मान्यवर व्यक्तींच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापणा केली जाते. मात्र, यंदा करोनाचे सावट पाहता गणेश मंडळांच्याच पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार आहे. या आठ गणेश मंडळांचे पदाधिकारी एकमेकांच्या मंडळांच्या गणरायाची विधीवत पूजा करणार आहेत.” यंदा करोनाच्या संकटामुळे हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करायचा निर्णय मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती आणि प्रमुख गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या मंडळांनी एकत्रित येऊन घेतला आहे.
कोणत्या गणपतीची प्रतिष्ठापना कोणाच्या हस्ते होणार?
कसबा गणपतीची प्रतिष्ठापना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने यांच्या हस्ते, तर श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच तांबडी जोगेश्वरी मंडळाची प्रतिष्ठापना अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्या हस्ते, तर अखिल मंडई मंडळाच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच गुरुजी तालीम मंडळाची प्रतिष्ठापना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते होणार असून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्रतिष्ठापना गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते होईल. त्याचबरोबर तुळशीबाग गणपतीची प्रतिष्ठापना केसरीवाडा गणपतीचे डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते तर केसरीवाडा गणपतीची प्रतिष्ठापना आणि आरती तुळशीबाग मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
यंदा सर्व मंडळांनी भाविकांना ऑनलाइन गणरायाचे दर्शन घेण्याची व्यवस्था केली असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे भाविकांनी या सेवाचा लाभ घ्यावा आणि रस्त्यावर येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले