
लॉकडाउनमुळे जिम आणि मंदिरं गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहेत. ती पुन्हा सुरु करावीत अशी मागणी वारंवार केली जात आहे. जिम १५ ऑगस्टपासून सुरु होतील असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं. मात्र त्यानंतर त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. १ सप्टेंबरपासून अनलॉक ४ ला सुरुवात होणार असून त्यावेळी जिम आणि मंदिरं सुरु कऱण्यासाठी परवानगी दिली जाईल का याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जिम, मंदिरं यासंबंधी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होऊ शकतो असं सांगितलं आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारने विरोध केला तरी २ सप्टेंबरपासून राज्यातील मशिदी उघडणार असल्याचं म्हटलं आहे. “आम्ही आमच्या वतीने अल्टिमेटम देत आहोत. १ तारखेला गणपती विसर्जन आहे. हिंदू बांधवांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. १ तारखेपासून सगळी मंदिरं उघडा आणि २ तारखेपासून आम्ही आमच्या सगळ्या मशिदी उघडणार. काही योग्य तर्क असतील तर ऐकू अन्यथा परवानगी दिली नाही तरी २ तारखेपासून सर्व मशिदी उघडू हे सरकारमधील लोकांना मला सांगायचं आहे,” असं आव्हानच इम्तियाज जलील यांनी दिलं आहे. यावेळी त्यांनी याची सुरुवात आपणच औरंगाबादमधून करणार असल्याचंही सांगितलं.