पुणे
Trending

जंबो कोविड रुग्णालयामध्ये ना पुरेसे डॉक्टर, ना रुग्णांना जेवण

मोठा गाजावाजा करीत उद्घाटन केलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरील जंबो कोविड रुग्णालयामध्ये ८०० रुग्णांसाठी आवश्यक असलेले तज्ज्ञ डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ उपलब्ध नाही. तेथील रुग्णांना नाश्ता, जेवण वेळेत उपलब्ध होत नसल्याच्या धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. या रुग्णालयात दाखल होणाऱ्या करोनाच्या संशयितांसाठी ५० खाटा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले असतानाही केवळ दहा खाटाच तेथे उपलब्ध असल्याचे महापालिकेने केलेल्या तपासणीत उघडकीस आले

पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी जंबो रुग्णालयात जवळपास सात तास बैठक घेत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. सद्यस्थितीला या रुग्णालयात ४००च्या आसपास रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार करण्यासाठीही पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. जंबो रुग्णालयाच्या उभारणीची पूर्ण जबाबदारी ही ‘पीएमआरडीए’कडे होती. या ठिकाणी काम करणाऱ्या एजन्सींची नेमणूकही ‘पीएमआरडीए’ने केली आहे. त्यानंतर हे रुग्णालय सुरू करून ते महापालिकेच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या ठिकाणच्या एजन्सी काम करताना महापालिका अधिकाऱ्यांचे ऐकत नसल्याच्या तक्रारी येत असून या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त कुमार यांनी दिवसभर आढावा बैठक घेतली आहे.

लाइफलाइन हॉस्पिटल्स सर्व्हिसेस, एएए हेल्थकेअर, पुणे या सल्लागारासमवेत झालेल्या बैठकांमध्ये महापालिका अधिकाऱ्यांना अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. यामध्ये जंबो रुग्णालयामध्ये ८०० खाटांसाठी आवश्यक असलेले तज्ज्ञ डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ उपलब्ध नसणे, रुग्णांना नाश्ता, जेवण वेळेत न मिळणे यासह मृतदेहांचे व्यवस्थापन व्यवस्थित होत नसल्याने आयसीएमआर पोर्टलवर नोंदणी करणे शक्य होत नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. जंबो रुग्णालयात करोनाबाधित सर्व रुग्णांना दाखल करून घेणे अपेक्षित असताना रुग्णाची ओळख आणि इतिहास माहिती नसल्यास त्यांना दाखल करून घेण्यात येत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. त्याशिवाय या ठिकाणी नेमके किती स्टाफ, डॉक्टर्स कामावर रुजू आहेत, याची माहिती उपलब्ध नसल्याची धक्कादायकही उघडकीस आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close