क्राइम
Trending

कृष्ण प्रकाश यांनी स्वीकारला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पदभार

मावळते पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांचा 'कॅट'मध्ये न जाण्याचा निर्णय

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आयुक्त पदाचा नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आज (शनिवार) पदभार स्वीकारला. दरम्यान, पिंपरी-चिंचवडचे मावळते पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (कॅट)मध्ये जाणार नसल्याचे ‘लोकसत्ता ऑनलाईन’ शी बोलताना सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस आयुक्त बिष्णोई यांची बदली होणार अशी चर्चा सुरू होती. अखेर त्यांची मुदतपूर्व बदली झाल्यानंतर चर्चेला पूर्ण विराम मिळालेला आहे. अवघे ११ महिने आणि दोन दिवस पिंपरी-चिंचवड शहराच्या आयुक्त पदी राहिले.

गृह विभागाने २ ऑगस्ट रोजी बदल्यांचे आदेश काढले त्यात मावळते पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांचे नाव होते. त्यांच्या जागी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली होती. यानुसार आज पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पदभार कृष्ण प्रकाश यांनी स्वीकारला. ते महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलीस महासंचालक होते. दरम्यान, गृह विभागाने मुदतपूर्व बदलीचे आदेश काढल्याने संदीप बिष्णोई हे नाराज असून कॅटमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. परंतु, त्यांनी कॅटमध्ये जाणार नसल्याचे ‘लोकसत्ता ऑनलाईन’ शी बोलताना स्पष्ट केले आहे.

आयुक्त संदीप बिष्णोई यांची २० सप्टेंबर २०१९ रोजी नियुक्ती झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २१ सप्टेंबर रोजी त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयाचा पदभार स्वीकारला होता. अवघ्या अकरा महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी शहरातील गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्यांना म्हणावे तसे यश आले नसल्याची चर्चा होती. शिवाय, अनेक अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल उघड नाराजी देखील दिसून येत होती. दरम्यान, गेल्या महिन्यात राष्ट्रवादीच्या एका आमदाराने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पोलीस आयुक्तांविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांच्या बदलीची जोरदार चर्चा स्थानिक पोलीस दलात सुरू झाली होती.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close