क्राइम
Trending

कंगना रणौतविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत  आणि महाराष्ट्र सरकारमधील वाद वाढत चालला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपमानास्पद भाषेचा वापर करून, तसेच त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत कंगनाविरोधात मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीबरोबरच कंगनाचे काही ट्विटही जोडले आहेत. तक्रारीत तिच्या एका व्हिडिओचाही उल्लेख केला आहे.

मुंबई महापालिकेने बुधवारी कंगना रणौतच्या घर वजा कार्यालयावर धडक कारवाई केली. अवैध बांधकाम केल्याचा ठपका ठेवत महापालिकेने ते उद्ध्वस्त केलं होतं. त्यानंतर कंगनाने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत नाराजी व्यक्त केली होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. कंगनाची बहीण रंगोली हिने गुरुवारी कार्यालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तिने कार्यालयाचे काही व्हिडिओ आणि फोटोही काढले आहेत. तसेच कंगनानेही पुन्हा उद्धव ठाकरे सरकारविरोधात ट्विटद्वारे टीका केली आहे.

अॅड. नितीन माने यांच्यामार्फत विक्रोळी पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कलम ४९९ अंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे माने यांनी तक्रारीत म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कंगना हिने ९ सप्टेंबरला सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून, तिने मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल अपमानास्पद भाषेचा वापर केला असून, तिने जाणूनबुजून फिल्म ‘माफिया’शी संबंध जोडून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तिच्याविरोधात कलम ४९९ अंतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माने यांनी तक्रारीद्वारे केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close