
पिंपरी: थंडीतापाच्या आजारासाठी दवाखान्यात गेलेल्या वृद्धाला डॉक्टरांनी हा करोना पण असू शकतो असे सांगितल्याने त्या वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘डॉक्टरने भीती दाखवल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे’ अशी चिठ्ठी लिहून या वृद्धाने आपले जीवन संपवले आहे. आज पहाटे भोसरी येथे ही घटना घडली.
शिवाजी मारुती होळकर (वय ६८, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गव्हाणे वस्ती, भोसरी येथे आज सकाळी होळकर यांनी गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. त्यांनी राहत्या घरात पंख्याच्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.
पोलिसांना तपासात होळकर यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीमध्ये लिहिले आहे की, ‘गेल्या आठ दिवसांपासून मला थंडी-ताप येत होता. त्यामुळे जवळच्या एका खासगी दवाखान्यात गेलो होतो. तिथल्या डॉक्टरांनी मला करोनाची लक्षणे असल्याची भीती दाखवली. त्या भीतीपोटी मी आत्महत्या करीत आहे.’ अशी चिठ्ठी सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस येताच नातेवाईकांनी होळकर यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, याबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे कुटुंबाचे म्हणणे असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
जळगावातही रुग्णाची आत्महत्या
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात जिल्हा कोविड रुग्णालयातही एका करोना सदृष्य लक्षण असलेल्या रुग्णाने गळफास घेऊन काल मध्यरात्री आत्महत्या केली. कोविड रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक सहामध्ये ही घटना घडली. कडुबा नकुल घोंगडे (वय ५० रा. पहूर ता. जामनेर ) असे आत्महत्या करणाऱ्या रुग्णाचे नाव असल्याचे सांगण्यात आले. कडुबा घोंगडे यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची करोनासाठी अँटीजेन चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. तरीही त्रास कमी होत नसल्याने त्यांना करोनाच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी जळगाव येथे कोविड रुग्णालयात हलविण्यात आले होते.पहुरच्या ग्रामीण रुग्णालयातून जळगाव येथील कोविड रुग्णालयात त्यांना ९ सप्टेंबर रोजी दाखल केले होते. कालच त्यांचे आरटीपीसीआर चाचणीसाठी स्त्राव घेण्यात आले होते. मात्र, त्याचा अहवाल येण्याआधीच मध्यरात्रीनंतर गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान, या रुग्णाच्या चाचणीचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह असल्याने सारेच हळहळले आहेत.