
कोंढवा परिसरात भररस्त्यात कोयत्याने केक कापण्याचा प्रकार काही जणांच्या चांगलाच अंगलट आला आहे. कोंढवा पोलिसांनी कारवाई करत अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करून त्यातील दोघांना अटक केली.
अक्षय अमरुषी शेलार (वय २२, रा. सिद्धार्थनगर, कोंढवा) आणि कृणाल प्रताप लोणकर (वय १९, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर सोनु भिसे, रोहन कसबे, गणेश चराटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस नाईक नितेश टपके यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनु भिसे याचा वाढदिवस असल्यामुळे त्याच्या मित्रांनी केक आणला होता. ते सर्व जण शनिवारी सायंकाळी एनआयबीएम रोडवरील लॉ वेंटेना मॉलसमोर रस्त्यावर जमले होते. हा केक चाकूने कापण्याऐवजी त्यांनी तो कोयत्याने कापला. हा सर्व प्रकार रस्त्यावरुन जाणारे येणारे पाहात होते. या केक कापण्याचे शुटींगही काहींनी केले.
याबाबत नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच कोंढवा पोलीस ठाण्याचे बीट मार्शल व इतर कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. इतर तिघे पळून गेले. या प्रकरणी कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत. भर रस्त्यात बुलेटवर किंवा चारचाकी गाडीच्या बोनटवर केक ठेवून तलवारीने कापण्याची पद्धत मागील काही दिवसापासून शहरात रूढ होत चालली आहे. त्यामुळे भाईंचा बर्थडे रडारवर ठेवत पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतल्यानंतर हा प्रकार थंडावला होता. मात्र पुन्हा असे प्रकार सुरू झाल्याचे निदर्शनास येत आहे.
Share