
दाट जंगलातील एक छोटेसे गाव…शेती आणि पशुपालनावर ग्रामस्थांची उपजीविका अवलंबून…मात्र, पाण्याअभावी गाव तहानलेले…काही ग्रामस्थ तर उपजीविकेसाठी शहरात निघून गेलेले…अशात एका गावकऱ्याने मात्र हार न मानता पावसाचे पाणी गावात आणण्याचा निर्धार केला. त्यासाठी तब्बल तीस वर्षे एकट्याने राबून तीन किलोमीटरपर्यंतचा कालवा खोदण्याची अशक्यप्राय कामगिरी पार पाडली. आता परिसरातील डोंगरावरून पावसाचे पाणी वाहून न जाता त्यांच्या गावात येणार आहे. एखाद्या चित्रपटात घडेल अशी घटना गया जिल्ह्यातील लाहथुआ येथील कोथिलावा या गावात घडली. आणि ही कामगिरी करणाऱ्या आजोबांचे नाव आहे लौंगी भुईयान.
-
‘मी गेल्या तीस वर्षांपासून नियमितपणे शेजारच्या जंगलात गुरे चरायला न्यायचो आणि कालव्यासाठी खोदकाम करायचो. या कामात मला कोणीही मदत केली नाही. गावकऱ्यांनी पोटापाण्यासाठी शहर गाठले; पण मी गावातच राहण्याचा निश्चय केला होता,’ असे भुईयान यांनी सांगितले.
कोथिलावा हे गाव गया शहरापासून ८० किलोमीटरवर दाट जंगलात वसलेले असून डोंगररांगांनी वेढलेले आहे. शेती आणि पशुपालन हेच येथील ग्रामस्थांचा उदरनिर्वाहाचे साधन आहे. पावसाळ्यामध्ये डोंगरांवरून वाहत येणारे पाणी नदीला जाऊन मिळायचे, यामुळे भुईयान अस्वस्थ झाले होते. हे पाणी वाचायला हवे आणि त्याचा गावासाठी वापर व्हायला हवा, हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे कालवा खोदण्याचे त्यांनी ठरवले. त्यासाठी एक-दोन नव्हे; तर तब्बल तीस वर्षे एकट्याने त्यांनी खोदकाम केले. आता त्यांच्या गावात पाणी आले असून यामुळे गावात मोठ्या संख्येने असलेल्या गुरांना आणि शेतीला पाणी मिळणार आहे. भुईयान यांचे हे काम फक्त त्यांच्या शेतीपुरते नसून संपूर्ण गावामध्ये यामुळे सुबत्ता येणार आहे, असे पत्ती मांझी या ग्रामस्थाने सांगितले.
‘भुईयान यांच्यामुळे भरपूर लोकांना फायदा झाला आहे. आता त्यांच्या कामामुळे त्यांनी सगळे ओळखू लागले आहेत, असे गावातील शिक्षक राम विलास सिंग यांनी सांगितले
Share