पुणे
Trending

कोरोनारूपी अफजलखानाशी गळाभेट घेताना…

डॉ गोपालकृष्ण गावडे, सिटी फर्टिलिटी सेंटर, पुणे

अफजल खान स्वराज्यावर चालून आला. शिवाजी महाराजांना माहीत होते की अफजलखानाशी भेट अटळ आहे. खान तसा परत जाणार नाही. स्वराज्याची नासधुस करत राहिल. खान शक्तीशाली होता. महाराजांनी तयारी केली नसती तर घात झाला असता.
तसाच कोविड आपल्यावर चालून आला आहे. जिवितहानी आणि अर्थव्यवस्थेची प्रचंड हानी करत सुटला आहे. त्याच्याशी भेट अटळ आहे. या कोविड खानाशी लढण्याची आपली तयारी कुठवर आली आहे?
परिस्थितीची चौफेर माहिती शिवाजी महाराजांच्या यशाचे मुख्य कारण होते.आज कोविडमुळे जगभरात लाखो लोक मरत आहेत. वैद्यकिय पार्श्वभूमी नसलेल्या लोकांना कोविड नक्की कसा घातक ठरतो हे फारसे माहीत नाही. आज मी तेच सोप्या शब्दात सांगायचा प्रयत्न करणार आहे. मी आज तुमचा बहिर्जी नाईक होणार आहे.
आपले शहर हे आपले शरीर आहे असे समजा. आपल्या शहरातील घरे म्हणजे शरीरातील पेशी. घरातील लोकांना ऊर्जेसाठी अन्न लागते. ते शिजवण्याची जागा म्हणजे स्वयंपाकघर. तशीच पेशीतील मायटोकाँड्रीया या भागात उर्जानिर्मितीसाठी लागणारी यंत्रणा असते. या स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यासाठी जसे भाजी-फळे-किराना लागतो तसेच पेशींना ऊर्जेसाठी आॕक्सिजन लागतो. स्वयंपाकघरात जसा कचरा निर्माण होतो तसाच पेशींमध्ये कार्बन डायऑक्साइड तयार होतो.
लोक(रक्त) घरासाठी भाजी-फळे-किराणा (आॕक्सिजन) आणायला मार्केटयार्डात जातात. रक्त फुफ्फुसाकडे जाताना सोबत त्याच्या घरातील कचरा (कार्बन डायऑक्साइड CO2) घेऊन जातात. हा कचरा शेतकऱ्यांना खते बनवण्यासाठी दिला जातो. दुसऱ्या बाजूने शेतकरी-व्यापारी (म्हणजे बाहेरची हवा) भाजी-फळे-किराणा (आॕक्सिजन O2) घेऊन विकायला मार्केटयार्डला येतात. परत जाताना ते शरीरातील पेशींचा कचरा म्हणजे कार्बन डायऑक्साइड खत बनवण्यासाठी शहराबाहेर घेऊन जातात.
मार्केटयार्डातील दुकाणे म्हणजे आपल्या फुफ्फुसाचा तो शेवटचा भाग जिथे एका बाजुने हवा(शेतकरी-व्यापारी) आणि दुसऱ्या बाजूने रक्त येऊन भेटतात. तिथे ते आॕक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचा वस्तूविनिमय करत असते.
जशी पब्लिक ट्रांसपोर्ट बसची यंत्रणा असते तशीच घरातील लोकांना म्हणजे रक्ताला मार्केट यार्ड पर्यंत नेणारी आणि परत आणणारी रक्तवाहिन्या आणि हृदयाच्या पंपाची यंत्रणा असते. ती O2 आणि CO2 ची वाहतूक करणाऱ्या रक्ताची पेशींकडून फुफ्फुसाकडे आणि फुफ्फुसाकडून पेशींकडे वाहतूक करतात.
त्याचप्रमाणे शेतमाल-किराणा तयार होण्याच्या जागेपासून मार्केटयार्डपर्यंत पोहचवण्यासाठी जशी गुड्स ट्रांसपोर्ट यंत्रणा असते तशीच हवेतील आॕक्सिजन फुफ्फुसतील शेवटच्या टोकापर्यंत पोहचवणारी यंत्रणा म्हणजे श्वसन यंत्रणा असते. हिच श्वसन यंत्रणा पेशींकडून मार्केटयार्डात जमा होणारा कचरा म्हणजे कार्बन डायऑक्साइडला फुफ्फुसातून बाहेर घेऊन जाते. तसेच ती आॕक्सिजन म्हणजे भाजी-फळे-किराणा बाहेरील हवेतून फुफ्फुसाकडे घेऊन जाते.
हृदययंत्रणा रक्ताची आणि श्वसनयंत्रणा हावेची वाहतूक स्नायूंच्या ताकतीवर करते. व्यायामाने आणि सरावाने हे स्नायू मजबुत होतात आणि त्यांचा स्टॕमिना वाढतो.
हे रूपक परत समजून घेऊ
1) शहर – शरीर
2) घरे – शरीरातील पेशी
3) स्वयंपाकघर – पेशीतील मायटोकाँड्रीया हा भाग
4) भाजी-फळे-किराणा – आॕक्सिजन (O2)
5) स्वयंपाक घरात तयार होणारा कचरा – कार्बन डायऑक्साइड (CO2)
6) पब्लिक ट्रांसपोर्ट – हृदय-रक्तवाहिन्या
7) मार्केटयार्डातील दुकाने – फुफ्फुसाचा शेवटचा भाग जिथे हवेतील आॕक्सिजन आणि रक्तातील कार्बन डायऑक्साइड यांचा वस्तूविनिमय होतो.
8) गुड्स ट्रांसपोर्ट – श्वसन यंत्रणा
मागणीनुसार उत्पन्न आणि पुरवठा हे कुठल्याही बाजाराचे मुख्य सुत्र असते. हृदयाचा पंप पेशींच्या आॕक्सिजनच्या गरजेनुसार रक्ताला फुफ्फुसाकडे पोहचवतो. पेशींच्या आॕक्सिजनच्या गरजेनुसार श्वसनयंत्रणा भाता चालवून आॕक्सिजनयुक्त हवेला फुफ्फुसापर्यंत पोहचवते. फुफ्फुसाच्या मार्केटयार्डमध्ये आॕक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचा वस्तू विनिमय होऊन पेशींची गरज भागेला इतका आॕक्सिजन घेऊन रक्त हृदयाकडे येते. तेथून ते पुढे पेशींकडे परत पंप केले जाते.
अशा प्रकारे पब्लिक ट्रांसपोर्ट(रक्तवाहिन्या-हृदय यंत्रणा), गुड्स ट्रांसपोर्ट (श्वसणयंत्रणा) आणि मार्केटयार्डाचे चालू असणे यावर घरांपर्यंत किती भाजी-फळे-किराणा पोहचणार हे ठरते. हृदययंत्रणेच्या पंपाचा वेग आणि श्वसणयंत्रणेचा भाता चालण्याचा वेग गरजेनुसार कमी जास्त होतो. शांत झोपलेले असताना हृदयाचे ठोके साधारणता मिनिटाला 70 च्या आसपास तर श्वासोश्वासाचा वेग मिनिटाला 15-16 च्या आसपास असतो. धावताना हृदयाचा वेग मिनिटाला 150 पर्यंत तर श्वसनाचा वेग मिनिटाला 60 पर्यंत जाऊ शकतो. नियमित गरजेपेक्षा जास्त आॕक्सिजन पुरवण्याच्या हृदयाच्या आणि श्वसणाच्या क्षमतेला राखीव क्षमता वा कारडिओ-रेस्पिरेटरी रिझर्व्ह असे म्हणतात. श्वसनाचा वेग मिनिटाला 25 च्या पुढे गेला की त्याची जाणीव होऊ लागते. या जाणीवेला आपण दम लागणे वा धाप लागणे असे म्हणतो.
आपल्या मार्केटयार्ड पैकी फक्त 60% भागात नियमित O2-CO2 व्यापार चालतो आणि 40% रिझर्व्ह असतो. आठवडी बाजाराला (व्यायामाच्या वेळी) आजुबाजुच्या गावातून लोक येतात. तेव्हा मागणी-पुरवठा वाढतो आणि मार्केटचा रिझर्व्ह भागही वापरात आणला जातो. अशा प्रकारे जास्त ग्राहक आणि व्यापाऱ्यांची वाढीव गरज भागवली जाते.
हृदयविकार, रक्तदाब वा मधूमेह असेल तर हृदयाचा पंप (पब्लिक ट्रांसपोर्ट) कमजोर झालेला असतो. स्मोकर्स आणि दमेकरींच्या गुड्स ट्रांसपोर्ट मध्ये अडथळे निर्माण झालेले असतात. स्मोकर्स व ठराविक फॕक्टरी वर्कर्स मध्ये फुफ्फुसे म्हणजे मार्केटयार्डची आधीच खुपशी पडझड झालेली असते. अंगमेहनत केल्यास हृदय आणि श्वसनसंस्थेच्या स्नायुंचा व्यायाम होतो व त्यांचा स्टॕमिना वाढतो. व्यायामाचा आभाव असेल किंवा फुफ्फुसे वा हृदय आजारी असेला तर शरीराला जास्त आॕक्सिजन पुरवठा करण्याची राखीव क्षमता कमी झालेली असते. याऊलट शहराचा पसारा अती वाढलेला (लठ्ठपणा असेल) तर शहराच्या गरजाही त्या प्रमाणात वाढतात. लॉकडाऊनमध्ये अति खाने व व्यायामाचा आभाव यामुळे ब-याच लोकांच्या शहराचा आकार वाढलेला आहे. मार्केट यार्ड मात्र एका मर्यादेच्या पुढे वाढू शकत नाही. जाड लोकांमध्ये मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण झाल्याने मार्केटयार्डची सर्व राखीव क्षमता आधीच वापरात आलेली असते. त्यानंतर करोनाने मार्केटची पडझड झाली तर रिझर्व्ह अभावी लगेच आॕक्सिजनची कमतरता निर्माण होते.
करोना फुफ्फुसांवर म्हणजे आपल्या मार्केटयार्डवर हल्ला करून तिथला काही भागाचे काम बंद पाडतो. मग त्या भागात चालणारा व्यापार बंद पडून काही घरांना भाजीपाला-किराना मिळणे दुरापास्त होते. पण तेथील व्यापारी आणि ग्राहक इतर रिझर्व्ह भागात O2 व CO2 ची देवाणघेवाण करून पेशींची गरज भागवतात. पण कोविडचा न्युमोनिया वाढत जातो आणि मार्केटयार्डातील आणखी आणखी भाग तो बंद पाडतो. आता तेथील ग्राहकांच्या(रक्ताच्या) आणि शेतकरी-व्यापा-यांच्या मध्ये होणारा वस्तुविनिमय होऊ लागतो. त्या भागाचे काम दुसऱ्या भागाला करावे लागते. मग मात्र मार्केट यार्डात पळापळ चालू होते. दिवसभर वेळ मिळणाऱ्या फळांच्या बाजारपेठेला अर्धा दिवस देऊन तिथे राहिलेल्या अर्ध्या दिवसात भाजी बाजार भरू लागतो. करोनाने न ग्रासलेल्या मर्केटयार्डच्या भागात ग्राहक आणि व्यापा-यांना त्यांचे व्यवहार पटपट करून दुसऱ्यांसाठी जागा मोकळी करून द्यावी लागते. हदयचा वेग आणि श्वसनाचा वेग वाढत जातो. आता धाप लागू लागते. मग डॉक्टर मास्कने 100% आॕक्सिजन देऊ लागतात. नेहमीच्या हवेत फक्त 20% आॕक्सिजन असतो. मास्कने 100% आॕक्सिजन देणे म्हणजे मार्केट यार्डाच्या चालू भागातील प्रत्येक दुकाणात गरजेच्या गोष्टींचे प्रमाण इतके वाढवणे की त्यातून पुरेसे ग्राहक हवा तितका O2 व CO2 विनियोग करून आपल्या घरांची गरज भागवतात. पेशंटचे श्वसन स्नायुंमार्फत चालू असते. या स्नायुंच्या जोरावर आणि 100% आॕक्सिजनच्या मदतीने डिमांड-सप्लायचा मेळ घतला जातो. पण अति कष्ट पडल्यास श्वसनाचे स्नायू हळूहळू थकून जातात.
करोनाने फुफ्फुसाचे मार्केटयार्ड आणखी बंद पाडले श्वसनाचे स्नायू थकले की फक्त आॕक्सिजन लावून गरज पुर्ण होत नाही. त्या वेळी श्वसनाच्या मदतीला व्हेंटिलेटर लावावा लागतो. व्हेंटीलेटरमध्ये अतिशय जास्त प्रमाणात 100% आॕक्सिजन जोर-जबरदस्तीने फुफ्फुसात पाठवला जातो आणि फुफ्फुसात जमा CO2 (कचरा) ओढून बाहेर पण काढला जातो. श्वसनाच्या स्नायुंना काहीसा वा पुर्ण आराम मिळतो.
याही पुढे जाऊन करोनाने फुफ्फुसाचा आनखी भाग काम करणे बंद झाला तर शहरातील बहुतेक घरात(पेशींमध्ये) फळे-भाजा-किराणा पोहचणे बंद होते. तिथला कचरा म्हणजे CO2 पण उचलून शहराबाहेर नेला जात नसल्याने त्याचा वेगळा त्रास सुरू होतो. कचरा पाण्याने सडला तर आणखी त्रास करातो तसाच CO2 रक्तातील पाण्याशी संयोग पाऊन शरीरला अतिशय धोकादायक ॲसिड तयार होते. या ॲसिडची पातळी ठराविक प्रमाणाबाहेर गेली की शरीरातील सर्व रक्तवाहिन्या आणि अवयव आतून भाजून निघतात. त्यात आपल्या शहरात रस्त्या रस्त्यावर करोना आणि आपले सैनिक म्हणजे पांढऱ्या पेशींमध्ये युद्ध जुंपते. कुठल्याही युद्धात सैनिकांपेक्षा सिव्हिलियन जास्त मरतात. त्याच नियमाने करोनाविरूद्धच्या या युद्धातही अनेक सामान्य घरे (पेशी) उध्वस्त होतात. शहरातील महत्त्वाच्या पदावर काम लोक युद्धाने वा रोगराईत ठार झाल्याने शहराची व्यवस्था टिकवणारे एक एक डिपार्टमेंट बंद पडू लागते. याला सिस्टिम फेल्युअर असे म्हणतात. फुफ्फुसाचे कार्य तर बंद पडलेले असतेच पण आता लिव्हरचे कार्य, किडनीचे कार्य, रक्त गोठण्याच्या सिस्टीमचे कार्य, हृदयाचे कार्य आणि मेंदुचे कार्य बंद पडते. शहराच्या महत्त्वाच्या व्यवस्था नष्ट झाल्यावर त्या शहरातील चैतन्य म्हणजे लोक शहर सोडून जातात. लोक सोडून गेलेल्या पडक्या घरांच्या समुहाला आता शहर न म्हणता खंडहर म्हणतात. हाच मृत्यू.
या सर्व टेक्निकल ज्ञानाचा उद्देश करोनाला आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम समजून घेणे हा होता. आता मुळ मुद्द्यावर येतो. सामान्य माणसाने करायचे काय? करोना होऊच नये म्हणून काय करायचे हे ज्ञान तुम्हाला चारी दिशांकडून मिळाले आहे. ते मी सांगणार नाही. 80% लोकांची गळाभेट घेतल्याशिवाय हा करोनाचा पाहुणा आपल्या गावाला परत जाणार नाही. करोनाने भेट घेतल्यावर कोण तगणार हा प्रश्न आहे.
कार्डिओ रेस्पिरेटरी रिझर्व्ह वाढवा – नेहमीच्या संख्येपेक्षा जास्त पटींनी ग्राहक पोहचण्यासाठी सक्षम पब्लिक ट्रांसपोर्ट, नेहमीच्या गरजेपेक्षा जास्त पटींनी माल मार्केटयार्डात आणणारी सक्षम गुड्स ट्रांसपोर्ट आणि नेहमीच्या गरजेपेक्षा भरपुर मोठा मार्केट यार्ड असेल तर करोनाने मार्केट यार्डची बरीच पडझड करूनही शहराच्या मुलभुत गरजा भागवल्या जातात.
या तिन्ही क्षमता व्यायामाने वाढतात.
कार्डिओ व्यायाम आणि प्राणायामसारखे श्वसनाचे व्यायाम मिळून हा रिझर्व्ह सहज वाढवता येतो. त्यासाठी एक सोपा व्यायामप्रकार उपलब्ध आहे. तो व्यायाम प्रकार म्हणजे सुर्यनमस्कार. सुर्यनमस्कारात स्नायुंच्या व्यायामासोबत प्राणायामाचीही जोड दिलेली असते.
सुर्यनमस्काराचे दोन प्रकार असतात.
1) संथ सुर्यनमस्कार
2) वेगवान सुर्यनमस्कार
यातील वेगवान सुर्यनमस्कार कार्डिओ व्यायामाचे फायदे देतात. तसेच त्यासोबत प्राणायामाची जोड असल्याने भरपुर आॕक्सिजन युक्त हवा फुफ्फुसाच्या कानाकोप-यांपर्यंत पोहचवण्याची क्षमता निर्माण होते.
छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाशी भेटीला जाण्याआधी संभाजी कावजी कोंढाळकर या अफजल खानाच्या आकाराच्या आपल्या सहका-यासोबत झुंजाचा सराव करत. त्यांनी आपल्या शारीरिक क्षमता प्रयत्नपुर्वक वाढवल्या होत्या. पुर्ण शारीरिक आणि मानसिक तयारीने गेल्याने त्यांनी अवाढव्य अफजलखानाला यमसदनी पाठवले.
अफजलखान प्रकरणात महाराजांनी आणखी एक गनिमी कावा केला. खुल्या मैदानात मोठ्या संख्येने शत्रू अंगावर घेतला असेल तर मराठ्यांचा खुर्दा उडाला असता. महाराजांनी अफजलखानाच्या सैन्याची लांडगेतोड केली. काही सैन्य वाईत, काही सैन्य प्रतापगडाच्या पायथ्याला आणि खानासह मोजके सैन्य प्रतापगडाच्या चढणीवर आर्ध्यात बोलावून घेतले. शक्तीचा समतोल साधून मग खानाला नष्ट केले. आजवर वैद्यकसेवेतील अनेक कोविडयोद्धे मोठ्या संख्येने या भयंकर आजाराला बळी पडले आहेत. कोविडने आजारी असलेल्या अनेक पेशंटच्या सतत संपर्कात असल्याने इतर लोकांपेक्षा फार जास्त संख्येने कोविड विषाणूने त्यांना गाठले. शत्रूचा हा प्रचंड हल्ला त्यांच्या प्रतिकारशक्तीला पेलावला नाही आणि ते कोविडला बळी पडले. छत्रपतींनी कोविडखानाच्या फौजेची जशी लांडगेतोड केली तशीच आपण कोविडखानाच्या फौजेची करायची आहे. एक तर गर्दीत मोठ्या संख्येने असलेल्या शत्रूवर चालून जाऊ नका. सोशल डिस्टंसींग पाळा. कोविडखानाचे काही सैन्य ट्रिपल लेअर मास्कने दुर ठेवा. काहींना हँड सॕनिटायझरने दुर करा. खानाला मोजके सैन्य घेऊन बोलवा आणि तुम्ही मात्र पुर्ण तयारी निशी त्याला भेटा. महाराजांसारखा गनीमी कावा वापरून कोविडखानाला लोळवा.
आपणही कोविड खानास हरवायचे असेल तर आपणही नियमित 20 मिनिटे वेगात सुर्यनमस्कार घालून आपल्या हृदयसंस्थेच्या आणि श्वसनसंस्थेच्या क्षमता वाढवा. सुर्यनमस्कार करणे शक्य नसेल तर एक तास वेगात चाला. सोशल डिस्टंसिंग पाळा. गरज असेल तेव्हाच आणि ट्रिपल लेअर मास्क लावूनच घराबाहेर पडा. घड्याळ लावून दर दोन तासांनी हात सॕनिटायझने निर्जंतूक करा. कोविडखानाच्या सैन्याची लांडगेतोड करा.
कोविडखानास भेटावे तर लागणारच आहे. तर मग पुर्ण तयारी निशी कोविडखानाला गनिमी काव्याने भेटा. मग बघा, कोविड खान तुमच्यासमोर टिकूच शकणार नाही.
कोविड खाना विरूद्ध गनिमी काव्यासाठी तुम्हाला गुड लक !

डॉ गोपालकृष्ण गावडे
सिटी फर्टिलिटी सेंटर, पुणे

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close