
चेन्नई: ऑनलाइन क्लाससाठी मोबाइल चोरी करणाऱ्या १३ वर्षीय मुलाला पोलिसांनी पकडले. मात्र, शिक्षणासाठी मोबाइल चोरल्याचे पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी मुलाला सोडले. इतकेच नाही तर मुलाला एक मोबाइल गिफ्ट म्हणून दिला.
पालिकेच्या एका शाळेत हा प्रकार घडला. १३ वर्षीय विद्यार्थ्याचे वडील एका बिस्कीटाच्या दुकानात काम करतात. त्याची आई घरकाम करते. मोबाइल नसल्याने त्याचे शिक्षण बंद पडले होते. त्याला शिकायचं होतं. मात्र, आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ते त्याला मोबाइल घेऊन देऊ शकत नव्हते. मुलाची ओळख दोन गुन्हेगारांशी झाली. त्यांनी मुलाला मोबाइल मिळवण्याचे प्रलोभन दाखवले. त्यांनी मुलाला मोबाइल चोरण्यास सांगितले. त्यानंतर त्याने मोबाइल चोरी केला. पोलिसांनी सर्व्हिलान्सच्या मदतीने मुलाला पकडले.
पोलिसांनी सांगितले की, मुलाला शेजारी राहणाऱ्या दोघा जणांनी मोबाइल चोरी करण्यासाठी सांगितले. मुलाने ऑनलाइन क्लाससाठी मोबाइल चोरी केल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी चोरीचा मोबाइल जप्त केला. त्यानंतर त्या मुलाला सोडून दिले. त्याचे शिक्षण सुरू राहावे यासाठी त्या मुलाला नवीन मोबाइल घेऊन दिला.