
महावार्ता वृत्तसेवा ः राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह जवळजवळ सर्वच मंत्री राज्यात नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पहाणी करीत असताना मुळशी दौर्यात सोमवारी 19 ऑक्टोंबरला खासदार सुप्रिया सुळे नुकसान ग्रस्त बांध्यावर जाणार की कोरोना काळात केवळ नियोजित उद्घाटन व आढावा बैठक करणार याबाबत मुळशीत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
ऑक्टोंबर हीटमधील अवकाळी पाऊसाने पुण्याजवळील निसर्गसंपन्न मुळशी तालुक्यातील भाताचे व सोयाबीन पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. दौरा करीत असलेल्या मुठा खोर्यातही मोठे नुकसान झाल्याने खासदार सुप्रिया सुळे नेमक्या कोेणत्या गावांना भेटी देणार हे संध्याकाळपर्यंत निश्चित झाले नव्हते. मात्र मुठा व लव्हार्र्डे गावातील उद्घाटनाची तयारी सुरू होती.
सोमवारी 19 ऑक्टोंबरला दुपारी 3 वाजता खासदार सुप्रिया सुळे यांचा मुळशी दौरा आहे. लव्हार्ड येथील शाळा इमारत उद्घाटन, पाण्याच्या टाकीचे भुमीपूजन, गुणवंत विद्यार्थी सत्कार, गोठा बांधकाम प्रशासकीय मान्यता, दुपारी 4 वाजता मुठा येथील आरोग्य केंद्रास भेट व त्यानंतर 5 वाजता हिंजवडीत खासदार सुळे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची आढाचा बैठक घेणार आहे. तसेच हिंजवडीत त्या माजी सरपंच सागर सागरे यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या घरी सात्वन भेटही देणार आहे.
मुळशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी सोशल मिडियावर आपला दौरा घोषित केला आहे. हा दौरा राष्ट्रवादी पक्षाचा वैयक्तिक दौरा असल्याचे सोशल मिडियाच्या माहितीवरून स्पष्ट होत आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत नुकसान ग्रस्त गावांतील शेतकर्यांना कोणताही निरोप गेला नव्हता. यामुळे खासदार सुप्रिया सुळे उद्घाटन, बैठका करणार की शेतकर्यांना दिलासा देणार याबाबत संभम्रता आहे.
शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी संबंधित यंत्रणेला मुळशीसह पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांचे पंचनामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली असल्याची माहिती मुळशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी रविवारी संध्याकाळी महावार्ताला दूरध्वनी करून दिली.
मुळशी तालुक्यात अजून नुकसानग्रस्त शेतकर्यांचे पंचनामे सुरू झाले नाहीत, याबाबत प्रशासनाला तातडीने सूचना देण्याची गरज आहे. गत आठवड्यात हवेली नुकसानग्रस्त बांध्यावर खासदार सुप्रिया सुळे गेल्या होत्या, आता खासदार सुळे या मुळशीतील सर्वसामान्य शेतकर्यांच्या नुकसानीची पहाणी करणार की राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्याच नुकसान झालेल्या शेतीला भेट देणार याबाबतही मुळशीत उलटसुलट चर्चा रंगली आहे. दरम्यान महादेव कोंढरे यांनी मुठया खोर्यातील नुकसानग्रस्त गावांना खासदार सुळे भेट देतील असे सांगितले आहे. मात्र मुठा खोरे व्यक्तिरिक्त तालुक्यातील नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याची शक्यता कमीच आहे.
Share