पौड पोलिसांकडून खून प्रकरणातील फरार आरोपीला सापळा रचून अटक
सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या पथकाची कामगिरी

डोक्यात मारहाण करुन युवकाचा खून करणाऱ्या आरोपीच्या पौड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 17 ऑक्टोबर रोजी गणेश हनुमंत पवार याच्या डोक्यात अज्ञात आरोपीने वार करुन गंभीर जखमी केले होते. पवार याचा उपचारादरम्यान ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. या गुन्ह्यातील फरार आरोपीला पौड पोलिसांनी अटक केली आहे.
निलेश पंढरीनाथ पिसाळ (वय-31 रा. ट्युलिप अपार्टेमंट, नर्हे ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पौड पोलिसांनी आरोपी निलेश पिसाळ याला नर्हे गावातील स्वामी नारायण मंदिरा जवळून अटक केली. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. पौड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत पवार याला अज्ञात व्यक्तीने डोक्यात मारहाण केली होती. पवार यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता.
वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे, पोलीस नाईक नितीन कदम, शेखर हगवणे, पोलिस शिपाई सुनिल कदम, होमगार्ड सुरवसे, पोलीस मित्र अभि पवळे, सौरभ निकटे असे पथक तयार करून त्यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे कामी रवाना केले होते.
या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना आरोपी निलेश पिसाळ हा गावातील स्वामी नारायण मंदिराजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मंदिराजवळ सापळा रचून आरोपीस शिताफीने पकडले व त्यास पोलीस स्टेशनला आणून सदर गुन्ह्यांचे तपास कामी अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे हे करीत आहे.