क्राइम
Trending

कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवर बसवून फिरवलं,पिंपरी-चिंचवडमधील प्रकार

आरोपीविरोधात गुन्हा दाखल

कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसाला पिंपरी-चिंचवडमध्ये एका कार चालकाने गाडीच्या बोनेटवर बसवून एक किलोमिटरपर्यंत फिरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गुरुवारी संध्याकाळी चिंचवड चौकात हा धक्कादायक प्रकार घडला. हा प्रकार घडत असताना वाहतूक पोलीस, रस्त्यावरील नागरिक या चालकाला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. परंतू हा वाहनचालक कोणत्याही प्रकारे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. आबासाहेब सावंत असं या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून या प्रकारात सावंत यांच्या गुडघ्याला जखम झाली आहे. तर सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली युवराज किसन हनवते याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलीस कर्मचारी आबासाहेब सावंत हे चिंचवड एलप्रोज चौकात आपलं कर्तव्य बजावत होते. विनामास्क घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करत होते. यादरम्यान मोटार चालक आरोपी युवराज हा त्या भागातून जात असताना सावंत यांनी त्याला थांबण्यास सांगितलं. मात्र सावंत यांच्याकडे दुर्लक्ष करत आरोपी युवराजने मोटार पढे नेली. मोटार थांबवण्यासाठी पोलीस कर्मचारी सावंत गाडीच्या समोर येऊन उभे राहिले आणि युवराज यांना खाली उतरण्यास सांगितलं. मात्र आरोपी युवराजने यावेळी काहीही न ऐकता सावंत यांच्या अंगावर गाडी घालून धूम स्टाईलने भरधाव वेगात गाडी पुढे नेली.
पोलीस कर्मचारी सावंत यांनी आपला जीव वाचवण्यासाठी गाडीच्या बोनेटला पकडून राहिले. गाडी थांबवण्याची वारंवार विनंती करत असतानाही युवराजने गाडी थांबवली नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा प्रकार घडत असतान रस्त्यावरील नागरिकांनीही आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हा प्रकार कैद केला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी युवराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close