क्राइम
Trending

बीएमडब्ल्यूवर लघुशंका केल्याने पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

पिंपरी-चिंचवडमध्ये बीएमडब्ल्यू मोटारीवर लघुशंका करत असताना हटकलं म्हणून सुरक्षारक्षकाला रिक्षा चालकाने पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. यात सुरक्षारक्षक २० टक्के भाजला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना भोसरी एमआयडीसी परिसरात घडली आहे. याप्रकरणी आरोपी रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
शंकर भगवान वायफळकर (४१) असं जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचं नाव असून महेंद्र बाळू कदम (३१) असं आरोपी रिक्षाचालकाचं नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित घटना मंगळवारी दुपारी घडली असून रात्री उशिरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर भगवान वायफळे हे सुरक्षारक्षक आहेत. कंपनीच्या गेटवर ते कर्तव्य बजावत होते. तेव्हा, आरोपी रिक्षाचालक महेंद्र बाळू कदम गेटजवळ कंपनीच्या मालकाच्या बीएमडब्ल्यू मोटारीवर लघुशंका करत होता. त्यावेळी शंकर यांनी हटकलं आणि लघुशंका करण्यास मज्जाव केला. त्यांच्यात किरकोळ वाद झाला आणि आरोपी कदम तिथून रिक्षा घेऊन निघून गेला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
मात्र, रिक्षाचालक महेंद्र कदमच्या मनात शंकर यांच्याविषयी चीड निर्माण झाली. साडे चार वाजण्याच्या सुमारास पुन्हा येऊन बाटलीतून आणलेलं पेट्रोल शंकर यांच्या अंगावर ओतून जिवंत जाळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. शंकर गंभीर जखमी झाले असून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आरोपी महेंद्र बाळू कदम याला पोलिसांनी अटक केली आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close