जगाच्या पाठीवर
Trending

धक्कादायक! संपूर्ण गावच निघालं ‘करोना पॉझिटीव्ह’

गावातील केवळ एका व्यक्तीचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आलाय

हिमाचल प्रदेशमधील लाहौल खोऱ्यातील एक संपूर्ण गावच करोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. थोरांग गावातील ५२ वर्षीय भूषण ठाकूर या एकमेव नागरिकाचा करोनाचा संसर्ग झालेला नाही. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार लाहौल-स्पिती हा जिल्हा राज्यातील सर्वाधिक करोनाबाधितांचा जिल्हा ठरला आहे.
लाहौलमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत अचानक मोठ्या संख्येने वाढ झाल्याने स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांना पर्यटकांना देण्यास बंदी घातली आहे. रोहतांग बोगद्याच्या उत्तरेकडील बाजूस हा सर्व प्रदेश आहे. गुरुवारपासून लाहौल खोऱ्यातील गावांमध्ये पर्यटकांना प्रवेेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बोगद्याच्या नंतरच्या प्रदेशात असणाऱ्या गावांमध्ये कोणत्याही पर्यटकास प्रवेश देण्यात येत नसून हा संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
मनाली आणि लेह महामार्गावरील थोरांग गावची लोकसंख्या केवळ ४२ इतकी आहे. हिवाळा सुरु असल्याने अनेकजण कुलूला स्थलांतरित झाले आहेत. या भागामध्ये पर्यटकांची संख्या वाढल्याने गावातील सर्वच नागरिकांनी करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आणि चाचणीचा निकाल पाहून स्थानिक प्रशासनालाही धक्का बसला. गावातील ४२ पैकी ४१ जणांच्या करोना चाचणीचा निकाल पॉझिटीव्ह आला आहे. भूषण ठाकूर या एकमेव व्यक्तीला करोनाचा संसर्ग झालेला नसल्याचे स्पष्ट झालं आहे.
“मी मागील चार दिवसांपासून एका वेगळ्या खोलीमध्ये राहत असून माझं जेवण मीच बनवत आहे. करोना चाचणीचे निकाल येण्याआधी आम्ही सर्व कुटुंबिय एकत्रच राहत होते. मी सॅनिटायझेशन, हात वारंवार धुणे, मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यासारख्या सर्व नियमांचे कडेकोटपणे पालन करत होतो. लोकांनी करोनाच्या साथीला हलक्यात घेऊ नये. हिवाळ्यामध्ये तर लोकांनी अधिक काळजी घेतली पाहिजे,” असं मत भूषण ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे. भूषण यांच्या कुटुंबातील पाच जणांना करोनाची लागण झाल्याने भूषणच क्वारंटाइन झाल्याप्रमाणे एकटे राहत आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका धार्मिक कार्यक्रमासाठी काही दिवासंपूर्वी गावातील सर्व लोक एकत्र आले होते. त्यामुळेच गावातील सर्वांना करोनाचा समुहिक संसर्ग झाल्याचे सांगितले जात आहे. लाहौल-स्पितीचे आरोग्य अधिकारी डॉ. पल्झोर यांनी स्थानिकांना करोना चाचणी करुन घेण्याचं आवाहन केलं आहे. जिल्ह्यामध्ये ८५६ जण करोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. स्पितीमध्ये मोठ्या प्रमाणात करोनाचा फैलाव होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. स्पितीमधीलच रंगरिक गावातील ३९ नागरिक २८ ऑक्टोबर रोजी करोना पॉझिटीव्ह असल्याचे आढलून आलं होतं. त्यानंतर हुर्लिंग गावातील १९ जण करोना पॉझिटीव्ह असल्याचेही स्पष्ट झालं होतं.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close