
वहानावरील ताबा सुटल्याने कॉक्रीट घेवून जाणारा मिक्सर थेट तीन ते चार दुकानात घुसला. शनिवारी रात्री १२ च्या सुमारास हि घटना मुळशी तालुक्यातील माण गावाच्या चौकात घडली. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.
हिंजवडी शेजारील असलेल्या माण गावाच्या चौकात शनिवारी रात्री बाराच्या सुमारास एम. एच १२ आर एन २१९२ या नंबरचा कॉक्रीट घेवून जाणाऱ्या मिक्सरवरील चालकाचा ताबा सुटला. त्याठिकाणी वळणाचा रस्ता असल्याने मिक्सर जागीच पलटी झाला. त्यामध्ये रस्त्याच्या कडेला असलेली तीन ते चार दुकाने, पत्राशेड चिरडले गेले. सुदैवाने हि घटना रात्री घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पी.एस.आय पवार यांनी पुढील कार्यवाही सुरु केली आहे.
अनेकवेळा रात्रीच्या वेळी चालक दारूच्या नशेत असतात. त्यामुळे भविष्यात मोठ्या दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने वाहणाऱ्या वाहनांना पायबंध घालणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच लक्ष घालून बेधुंद चालकांची नशा उतरवण्याचे काम करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Share