
ग्रामपंचायत उमेदवारांसाठी सोशल मिडियावर व्हायरल होत असलेली आचारसंहिता
ग्रामपंचायत निवडणूक (२०२१) चे बिगुल वाजले आहेत.. उमेदवार म्हणून उभे राहताना आणि मतदार म्हणून मतदान करताना देखील काही शर्ती आणि अटी अशा आहेत की, ज्यांचे आपण सर्वांनीच तंतोतंत पालन केले पाहिजे!!!
१) उमेदवार म्हणून उभे राहताना जर ‘ पराजय ‘
पचवण्याची क्षमता आणि मोठेपणा असेल तरच उभे राहावे , अन्यथा उमेदवार म्हणून उभे न राहिलेलेच बरे ! मतदार असणाऱ्यांनी तुम्हाला उभे राहण्याचे आमंत्रण अजिबात दिलेले नाही! आजचा मतदार इतका सुज्ञ झालेला आहे की तो भल्याभल्यांचे बारा वाजवतो ! हे लक्षात घेऊन , नंतर निवडणुकीत हरल्यावर कोणत्याही प्रकारची शिवीगाळ मतदारांना होणार नाही याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी. कारण ‘ अरे ‘ ला ‘ का रे ?’ करण्याची क्षमता सुदैवाने सगळ्यांकडे आहे , याची प्रत्येकाने ‘ साभार ‘ नोंद घ्यावी.
२) निवडणूक विकासाच्या भूमिकेवरती पार पडावी. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक गोष्टीचा आधार उमेदवाराने निवडून येण्यासाठी घेऊ नये , व अशा उमेदवारांना मतदारांनीही थारा देऊ नये.
३) मतदान करताना गावकी , भावकी , जवळचा , दुरचा असा विचार न करता विकासाभिमुख असणार्या उमेदवारालाच मते द्यावीत..त्या साठी मते मागणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे पुढील पाच वर्षासाठी असणारी विकासाची blueprint मागा. नाही दिल्यास पर्यायी उमेदवाराचा विचार करा, त्यानेही नाही दिल्यास NOTA ( None Of The Above) , अर्थात वरील पैकी कोणीही नाही चा पर्याय आपल्याकडे आहेच !
४) कोणीही कोणत्याही उमेदवाराच्या प्रलोभनांना बळी न पडता खंडोबाचा भंडारा किंवा इतर शपथा घेऊ नयेत , कारण निवडून उमेदवार येणार आहे ! उलट त्यानेच बेलभंडारा घेऊन विकास करण्याची शपथ घेतली पाहिजे . म्हणून त्यालाच बेलभंडारा देऊन विकासाची शपथ घेण्यास भाग पाडा , त्यास शक्य नसेल तर चहापान करून त्याची बोळवण करावी.
५) निवडणूक एक दिवसाची असते , परंतु त्या निवडणुकीतील ‘ हार-जीत ‘ या गोष्टींमुळे वैयक्तिक संबंध बिघडतात , ते वैयक्तिक संबंध बिघडू नयेत याची सर्वच उमेदवार आणि मतदार यांनी काटेकोरपणे काळजी घ्यावी.
६) मतदान करताना लक्षात ठेवा , विकसित राष्ट्र म्हणवून घेणाऱ्या अमेरिका आणि इंग्लंड सारख्या देशातील सर्वसामान्य नागरिकांना देखील जो मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी भांडावे लागले , तो मतदानाचा हक्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीतील सर्व सदस्य यांच्या मुळे आपणा सर्वांना अगदी सहजासहजी मिळालेला आहे , त्याचा केवळ आणि केवळ गावच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासासाठी वापर करा..
७) ग्रामपंचायत निवडणुकीला उभे राहणे व निवडून येणे ही कोणत्याही प्रकारची कौटुंबिक विरासत असू शकत नाही , याचे भान ठेवूनच उमेदवाराने उभे रहावे ! पडल्यास मतदार राजा जबाबदार असणार नाही याचे देखील भान ठेवावे
८) पण उमेदवार म्हणून निवडणुकीला उभा राहणार असाल तर आपण भविष्यकाळात काय करणार आहात हे सांगण्यापेक्षा आपण भूतकाळात काय केले याचा विचार करूनच जनता आपल्याला मतदान करणार आहे याचे भान असू द्यात.
९) उमेदाराने निवडणुकीस उभे राहताना आपल्या घरातील लहान थोर मंडळी समाजातील भावकी व गावकी यांचा मान सन्मान ठेवण्याची ताकद आपल्यात आहे का याचा जरा विचार करा व यापूर्वी आपण त्यांच्याशी नीट वागलो आहे का हे थोडेसे आठवा.
१०) फक्त निवडणुकीपुरते लोकांशी गोडीगुलाबीने बोलून व पाठीमागे लोकांचा अपमान करून त्यांच्या आर्थिक सामाजिक भावना भावकीत भांडणे लावून त्यांच्यात वाद लावलेले नाही ना याचीही जाणीव ठेवा
Share