
डॉ राजेंद्र भस्मे, खगोल अभ्यासक
खगोलप्रेमी वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पहात असतात तो मिथुन राशीतील वर्षातील सर्वात मोठा उल्कावर्षाव जेमतेम 7 दिवसांवर आला आहे. तासाला 50 पेक्षा अधिक उल्का पाहायला मिळणे ही मोठी पर्वणीच असते. 13 डिसेंबर च्या रात्रीपासून 14 डिसेंबर च्या पहाटेपर्यंत मोठ्या संख्येने उल्कावर्षाव पाहता येईल. *सर्वात अधिक संख्या रात्री 2 वाजायच्या सुमारास आढळून येईल.* शहरीकरणाचा परिणामातून निर्माण होणारे उजेडाचे प्रदूषण (Light Pollution) हे उल्कावर्षाव पाहण्यामधील सर्वात मोठा अडथळा ठरते. शहरापासून25-30 किलोमीटर अंतरावर पुरेसा अंधार असलेल्या ठिकाणी गेले असता मोठ्या संख्येने उल्का पहावयास मिळतात. यावर्षी अमावस्या व उल्कावर्षाव एकाच दिवशी असल्याने हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. रात्री चटईवर झोपून उघड्या डोळ्यांनी आकाशात सर्वत्र उल्का पहावयास मिळतात. या उल्का ज्या दिशेने आल्या त्याचा माग काढला असता त्याचा केंद्र बिंदू मिथुन राशीत आढळतो म्हणून याला मिथुन राशीतील उल्कावर्षाव (Geminids) म्हणतात. *3200 Phaethon* या धूमकेतूचे पृथ्वीच्या कक्षेत शिल्लक राहिलेले अवशेष उल्कांच्या रुपात दरवर्षी आपणास 13 डिसेंबर च्या रात्री पहावयास मिळतात.सर्व खगोलप्रेमींनी कोणत्याही उपकरणाशिवाय निव्वळ डोळ्यांनी पाहावयचा हा आकाशातील अविस्मरणीय सोहळा पाहण्यास चुकवू नये.
Share