खेळ खेळाडूमहाराष्ट्र
Trending
भावपूर्ण आदरांजली….दिल्ली जिंकणारा पहिला हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे
महावार्ता परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली

क्रीडा अभ्यासक संजय दुधाणे यांच्या हिंदकेसरी पुस्तकातून…
देशाची राजधानी दिल्ली येथील न्यू रेल्वे स्टेडियम… दिनांक 3 मे 1959… वेळ सकाळी दहाची. लाल मातीच्या आखाड्यात हजारो कुस्तीशौकिनांच्या गराड्यात एक विलक्षण लढत… ‘देशाचा पहिला हिंदकेसरी कोण?’ हे ठरविणारी लढत झाली. नवी दिल्लीतील भव्य स्टेडियम गर्दीने फुलून गेले होते. सार्या मैदानात उत्साह व चैतन्य ओसंडत होते. अखिल राष्ट्रातील मल्लविद्येच्या अजिंक्यपदाचा सामना आता होणार होता. मल्लविद्येत सारख्याच तोलाचे असलेले पंजाब व महाराष्ट्र हे दोन प्रांत आपली परंपरा व वारसा घेऊन या अजिंक्यपदाच्या मुकुटासाठी पुढे सरसावले होते. रूस्तुम-ए-पंजाब बत्तासिंग व श्रीपती खंचनाळे हे दोघे आपापल्या प्रांताची प्रतिष्ठा पणाला लावून मैदानात उतरणार होते.
प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरांत कुस्तीचा पुकार होताच दोघे मल्ल मैदानात आले आणि एकमेकांना आव्हान देण्याच्या पवित्र्यात उभे राहिले. दोघेही सारख्याच तोलाचे दिसत असल्याने कुस्तीच्या निकालाबद्दल प्रेक्षकांत कमालीचे औत्सुक्य वाढले होते.
प्रारंभी खडाखडी कुस्ती सुरू झाली आणि दोन्ही मल्ल एकमेकांचे बल अजमाविण्याचा प्रयत्न करू लागले. खडाखडी होत असतानाच झटापट होऊ लागली. दोन प्रचंड देह एकमेकांवर आदळू लागले. कुस्तीला रंग भरू लागला. प्रेक्षकांतून आरोळ्या उठू लागल्या. दोन्ही मल्ल आपली ताकद व कौशल्य पणाला लावू लागले आणि सहाव्या मिनिटाला श्रीपती खंचनाळेने बंत्तासिंगला खाली घेतले. मैदानावरच्या हजारो प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला आणि दुसर्याच क्षणाला आता पुढे काय होते बघण्यासाठी सर्वांचे श्वास आपोआपच रोखले गेले.
बंत्तासिंग खाली सापडल्यावर श्रीपती खंचनाळे आता त्याला चीतपट मारणार, अशी प्रेक्षकांची जवळजवळ खात्रीच झाली. बंत्तासिंगला खाली घेऊन श्रीपती ज्या पवित्र्यात बसला होता, त्यात त्याची ऐट, डौल व आत्मविश्वास दिसत होता. काही मिनिटांतच बंत्तासिंगाची पाठ श्रीपती मातीला लावणार, असे वाटत होते आणि श्रीपतीने तसा डाव टाकण्यासाठी हालचालीदेखील चालू केल्या. आपल्या ताकदीचा व कौशल्याचा पुरेपूर उपयोग करून घेऊन श्रीपती आता बंत्तासिंगला भारी पडणार, हे उघड होते.
श्रीपतीच्या पोलादी मिठीत अडकून बसलेला बंत्तासिंग मातीत रुतून बसला होता. लवकर हलता हलेना. कोंडीत सापडलेल्या वाघासारखा त्याचा चेहरा क्रुद्ध झाला होता. निसटून वर येण्यासाठी त्याची धडपड चालली होती. कुठल्या क्षणाला काय घडेल, म्हणून प्रेक्षक एकटक पाहत होते. सर्वांचे डोळे त्या अपूर्व क्षणावर खिळले होते.

…आणि कुस्तीचा रंग क्षणात अचानक पालटला. श्रीपतीच्या मगरमिठीतून बंत्तासिंग वार्याच्या वेगाने खालून निसटला व उभा राहिला. मैदानात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
वर आल्यानंतर बंत्तासिंग नव्या तडफेने लढू लागला. त्याउलट हातची शिकार गेली म्हणून श्रीपती बेभान झाला. दोन्ही पहिलवानांची झटापट विजेच्या चपळाईने होऊ लागली. वाघ व सिंह एकमेकांवर झडप घालण्यासाठी संधी पाहू लागले. डावावर प्रतिडाव होऊ लागले. मात्र आता पहिल्यापासूनच आक्रमक असलेला श्रीपती अधिकच चढाई करू लागला. त्यांच्या अंगात सिंहाचं बळ संचारलं. कुस्ती सुरू होऊन नऊ मिनिटं होत आली होती आणि पुन्हा एकदा बंत्तासिंगावर डाव उलटला. श्रीपतीनं पुन्हा त्याला खाली घेतलं आणि हा-हा म्हणता घुटना ठेवून बंत्ताला चारी मुंड्या चीत केलं. महाराष्ट्राच्या सिंहापुढे पंजाबचा वाघ शरण आला होता.
मैदानात एकच जल्लोष उडाला. टाळ्यांचा गजर तर सारखा होत होता. श्रीपती खंचनाळेची वाहवा चालली होती. त्याच्या नावाचा जयजयकार दुमदुमत होता आणि त्याच्या गळ्यात असंख्य हार पडत होते.
श्रीपतीनं ‘हिंदकेसरी’ पद जिंकलं होतं. राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांच्या हातून मल्लक्रीडेतील अजिंक्यपदाची गदा समारंभपूर्वक स्वीकारताना श्रीपतीच्या मुद्रेवर अभिमान ओसंडत होता. वैयक्तिक विजयापेक्षा अखिल भारतात महाराष्ट्राचा गौरव झाल्याबद्दल त्याला अधिक अभिमान वाटला.
राजर्षी शाहूंच्या राजाश्रयाने कोल्हापूर हे कुस्तीचे माहेरघर बनले आणि पुढे लोकाश्रयामुळे बहरत गेले. यातून अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल इथे निर्माण झाले. श्रीपती खंचनाळे यांनी पहिल्या हिंदकेसरीपदाची गदा आपल्या खांद्यावर घेत या मल्लपरंपरेत मानाचा शिरपेच रोवला.
जन्मभूमी कर्नाटक, तर कर्मभूमी मात्र महाराष्ट्र – असे आगळे वैशिष्ट्य असलेल्या श्रीपतीचा जन्म 1934 मध्ये बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यात एकसंबा गावी झाला. घरची स्थिती समाधानकारक असल्याने श्रीपतीच्या बालपणाचा काळ सुखाचा असाच होता. सुदैवाने शंकररावांसारख्या प्रेमळ पित्याचे कृपाछत्र श्रीपतीस लाभले होते. बालवयात श्रीपती स्वच्छंदी मनाचा व खेळकर होता. रानावनात शीळ घालीत हिंडावे, पक्ष्यांशी हितगुज करावे, पक्ष्यांप्रमाणेच सैरावैरा धावावे, नदीत डुंबावे, शेतातील कोवळी कणसे खात फिरावे – असा श्रीपतीचा नित्यक्रम होता.
घरात दूधदुभत्याला तर तोटाच नव्हता. साहजिकच बाल श्रीपतीची चंगळ होती. शंकररावांची एक वेडी आशा होती की – माझ्या मुलाने शरीर कमवावे, नामवंत कुस्तीपटू बनावे आणि त्या दृष्टीने ते श्रीपतीच्या बालमनावर संस्कार करण्याचे प्रयत्न करीत. निरनिराळ्या जत्रांना ते श्रीपतीस घेऊन जात. येथे भरणार्या कुस्त्यांच्या दंगली त्यास दाखवीत. नकळत कुस्तीप्रेमाचे बीज श्रीपतीच्या मनात रुजले गेले आणि हा-हा म्हणता त्या बीजास अंकुरही फुटला. आपण कुस्तीपटू व्हावे, ही इच्छा श्रीपतीच्या मनात निर्माण झाली. खरा शूरवीर आपल्या मनातील इच्छा पुरी करण्यासाठी कोणतेही दिव्य करण्यास सिद्ध असतो.
कुस्तीवीर होण्यासाठी वाटेल ते श्रम घेण्याची श्रीपतीची तयारी होती. आपल्या मुलाच्या मनाची ही जिद्द व तयारी पाहून शंकररावांना आनंद वाटावा, यात नवल नव्हते. चांगल्या गुरूच्या चरणी आपल्या छोट्या वीरास अर्पण केल्यास त्यातून चांगली कलाकृती निर्माण होईल, असा शंकररावांचा आशावाद होता. श्रेष्ठ गुरूच्या आशीर्वादाने श्रेष्ठ शिष्यच तयार होणार, अशी शंकररावांची खात्री होती आणि म्हणूनच त्या दृष्टीने ते योग्य गुरूच्या शोधात होते. 18-19 वर्षांच्या तरण्याबांड श्रीपतीला त्यांनी कुस्तीची काशी गणल्या जाणार्या कोल्हापूरला पाठविले. तारुण्याने बहरलेल्या व पीळदार शरीरयष्टीकडे पाहून कोल्हापूरचे कुस्ती भीष्माचार्य कै. विष्णुपंत नागराळे श्रीपतीवर एकदम खूष झाले. विष्णुपंतांच्या कृपादृष्टीमुळे शाहूपुरीसारख्या श्रेष्ठ तालमीत कुस्तीचे प्राथमिक धडे घेण्याचे भाग्य श्रीपतीस लाभले.
गोड स्वभाव, दुसर्याचे हित चिंतणारे व कोणासही योग्य ते मार्गदर्शन करण्यास सदैव तयार असणारे म्हणून कै. विष्णू नागराळे यांची ख्याती होती. गुरूचे हे गुण श्रीपतीच्या अंगी उतरावेत, यात नवल ते काय. आपल्या गुरूच्या उमद्या स्वभावाचे प्रतिबिंब श्रीपतीच्या व्यक्तिमत्त्वावर पडले. गुरू-शिष्याचे एकमेकांवर अपार प्रेम होते, परंतु हे प्रेम काळास पाहावले नाही. नुकताच कुठे फुलू लागणारा प्रेमवृक्ष त्याने निर्दयपणे मधेच छाटून टाकला. विष्णुपंतांना 1959 मध्ये देवाघरचे बोलावणे आले आणि शिष्याला पोरके करून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. दु:खी-कष्टी बनलेल्या श्रीपतीस सुदैवाने पुन्हा एका चांगल्या गुरूचा लाभ झाला. सत्तरी ओलांडलेले व अनेक वीर शिष्य निर्माण करणारे वस्ताद हसनबाबू तांबोळी यांचा गुरूलाभ श्रीपतीस झाला. प्रथमदर्शनीच हसनबाबूंची श्रीपतीवर विशेष मर्जी बजली. श्रीपतीला एकापेक्षा एक सरस डाव ते शिकवू लागले भल्या पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ते श्रीपतीकडून मेहनत करवून घेत असत. आता आपण एखाद्या प्रबळ वीराबरोबर लढत द्यावी, हा विचार श्रीपतीच्या मनात घोळू लागला. स्वत:बद्दल त्यास आत्मविश्वास वाटू लागला.
जत्रेतील मोठ्या कुस्त्यांत तो भाग घेऊ लागला. प्रत्येक लढतीत विजयश्री श्रीपतीच्या बाजूने कौल देऊ लागली. श्रीपतीची विजयी घोडदौड पाहून त्याची कुस्ती प्रबळ अशा रंगा पाटील-नेर्लेकर याच्याबरोबर ‘अकोर’ गावी ठरविण्यात आली. या लढतीबरोबरच श्रीपतीचा कोल्हापूरच्या आसपास बोलबाला झाला. चपळाई व आक्रमक या गुणांनी कुस्तीरसिकांची मने तो काबीज करू लागला. मोठमोठ्या पहेलवानांबरोबर त्याच्या सलाम्या होऊ लागल्या. नझीर महंमद, शामराव मुळीक, बचनसिंग, खडकसिंग, बंत्तासिंग, मेहरदीन, किसनलाल पांधा, सुखदेव सैया, सुचासिंग, छोटा भगवती, सचीराम, महंमद टायगर, आनंद शिरगांवे, चांदा पंजाबी, मोती पंजाबी, जीरा पंजाबी, गणपत आंदळकर आदी एकापेक्षा एक सरस वीरांबरोबर श्रीपतीच्या लढती झाल्या. त्यातील कित्येकांना तर त्याने क्षणार्धात आकाशातील तारका पाहावयास लावल्या. सुखदेव सैयास 7 सेकंदांत, सचीरामला 4 मिनिटांत, टायगरला 3 मिनिटांत, बचनसिंगला 4 मिनिटांत, बत्तासिंगला 10 मिनिटांत व चांदा पंजाबीस 2 मिनिटांत श्रीपतीने लोळविले.
सन 1959 च्या मार्च महिन्याच्या अखेरीस सांगली येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात श्रीपती खंचनाळे सहभागी झाले होते. यात त्यांनी कराडचे मल्ल आनंदा शिरगांवकर यांना अवघ्या दोन मिनिटांच्या चटकदार कुस्तीत पराभूत करून मुंबई राज्य विजेतेपदाच्या बहुमानाची विष्णू नागराळे स्मृती गदा पटकावली. खंचनाळे यांचे कुस्तीकौशल्य पाहून राज्य कुस्तीगीर परिषदेने दिल्ली येथील पहिल्या हिंदकेसरी स्पर्धेसाठी श्रीपती खंचनाळे यांची निवड केली. हिंदकेसरी स्पर्धेत महाराष्ट्राकडून श्रीपती खंचनाळे सहभागी होणार, ही वार्ता कानांवर पडताच देशभरातील अनेक नामवंत मल्लांनी या स्पर्धेतून काढता पाय घेतला. मानाच्या गदेसाठी दि. 2 मे 1959 रोजी बंत्तासिंग व खंचनाळे एकमेकांना भिडले. खंचनाळेंनी चार वेळा पट काढून बन्तासिंगवर ताबा मिळवला, पण पंच गुरू हनुमान यांनी पुन्हा कुस्ती खडाखडी सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे खंचनाळे यांच्यावर एक प्रकारे अन्यायच होत होता. अखेर 28 मिनिटांनंतर पंचांनी कुस्ती बरोबरीत सोडविली. या वेळी तिथे उपस्थित असलेले तत्कालीन कुस्तीप्रेमी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्याकडे खंचनाळे यांनी कुस्ती निकाली करण्याचा आग्रह केला. यावर राष्ट्रपतींनी दि. 3 रोजी सकाळी 10 वाजता पुन्हा कुस्ती लावण्याचे जाहीर केले. तसेच पंच म्हणून प्रसिद्ध पैलवान केसरसिंग यांना नियुक्त केले.
राष्ट्रपतींच्या उपस्थितीत दि. 3 मे 1959 रोजी झालेल्या पहिल्या हिंदकेसरी किताबासाठीची लढत पाहण्यासाठी देशभरातून हजारो कुस्तीशौकिन उपस्थित होते. कुस्ती सुरू होताच नवव्या मिनिटाला खंचनाळे आपल्या हुकमी घुटना डावावर बंत्तासिंगला चीतपट करून त्याच्या छातीवर स्वार झाले आणि हिंदकेसरी किताबावर आपल्या नावाचे शिक्कामोर्तब केले. राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते त्यांना मानाची पहिल्या ‘हिंदकेसरी’ची गदा प्रदान करण्यात आली. या वेळी गोविंद वल्लभ पंत, जगजीवन राम, मामासाहेब मोहोळ तसेच कुस्तीक्षेत्रातील दिग्गज मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारताच्या पहिल्या हिंदकेसरीचा मान मिळविणारे श्रीपती खंचनाळे यांचा सत्कार तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्ली येथे आपल्या निवासस्थानी केला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही मंत्रालयात त्यांना गौरविले. कोल्हापूरचे छत्रपती शहाजीमहाराजांनीही शाहू खासबाग मैदानात राजर्षी शाहूंच्या स्वप्नपूर्तीचा सत्कार केला. तत्कालीन नगराध्यक्ष रवींद्र सबनीस यांनीही कोल्हापूरच्या जनतेच्या वतीने त्यांना सन्मानित केले.
हिंदकेसरीपद जिंकून खंचनाळे थांबले नाहीत. त्यांना अनेक कुस्त्यांची आमंत्रणे यायला लागली. कर्तार पंजाबी, खडकसिंग, सादिक पंजाबी, मंगलराय, टायगर बच्चनसिंग, नजीर अहमद, मोती पंजाबी, गुलाब कादर यांसारख्या अनेक नावाजलेल्या मल्लांवर त्यांनी मात केली. सर्वश्रेष्ठ हिंदकेसरी किताब मिळाल्यावर अहंकारांच्या आहारी न जाता श्रीपतीने आपल्या कलेची आराधना मनोभावे चालू ठेवली. राष्ट्रीय स्पर्धेत 1962 मध्ये त्यांनी सुवर्णयश संपादून हिंदकेसरीपद हा योगायोग नव्हता, हेदेखील सिद्ध केले होते.
पुण्यात झाली होती
हिंदकेसरीची भविष्यवाणीश्रीपती खंचनाळे हे वर्षभरात देशात नाव गाजविणार, ते हिंदकेसरी होणार- ही भविष्यवाणी पुणे शहरात झाली होती. दिल्लीला हिंदकेसरी स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी 2-3 महिने खंचनाळे यांचा मुक्काम पुण्यात होता. मंडईत रहाणारे तात्या थोरात यांच्या वाड्यात ते राहात असत. थोरांताकडे प्राध्यापक असणारे एक ज्योतिष मित्र होेते. त्यांची पुण्यात आल्यावर खंचनाळे यांच्याशी थोरात यांनी भेट घडवून आणली.
तेजःपुंज चेहरा पाहून ज्योतिषशास्त्र जाणणारे प्राध्यापक महोदय खंचनाळे यांना म्हणाले की, वर्षभरात तुमचे नाव देशात गाजणार आहे, अनमोल कीर्ती तुम्ही संपादन करणार आहात. हिंदकेसरी स्पर्धाही जिंकाल. अवघ्या सहा महिन्यांतच मे 1959 मध्ये श्रीपती खंचनाळे यांनी हिंदकेसरी किताब जिंकला आणि पुण्यात झालेली भविष्यवाणी खरी ठरली.
हिंदकेसरीचा पराक्रम केल्यानंतर बाळासाहेब देसाई आणि मामासाहेब मोहोळ यांच्या हस्ते खंचनाळे यांना विशेष सत्कारही पुण्यात करण्यात आला होता.
Share