
महावार्ता न्यूज : ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा मुळशी तालुक्यात उडाला असून हिंजवडीत निवडणूकीमुळे 10 दिवसांत 22 लाखांचा कर जमा आहे. हिंजवडीच्या तुलनेत माण, मारूंजीत ग्रामपंचायतीत कमी प्रतिसाद मिळाला आहे.
११ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि लागलीच अनेक इच्छुकांनी पाणीपट्टी, घरपट्टी भरून निवडणुकीसाठी लागणाऱ्या कागदपत्राची जुळवाजुळव सुरु केली. बघता बघता केवळ दहा दिवसांत हिंजवडी ग्रामपंचायतीला तब्बल २२ लाख ८७ हजार रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला. त्यामुळे कोरोनाच्या काळात मोकळी झालेली तिजोरी ग्रामपंचायत निवडणुकीमुळे पुन्हा ओव्हरफ्लो झाली आहे.
हिंजवडीत कमर्शियल कर अधिक असल्याने व सरपंच पदाच्या खुल्या गटासाठी राखीव होणार असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी ना हरकत प्रमाणपत्रसाठी कर भरण्याची घाई केली आहे.
गेली आठ महिन्यात कोरोनाचा परिणाम थेट ग्रामपंचायतीच्या तिजोरीवर पहायला मिळाला. वारंवार आवाहन करूनही नागरिक मिळकत कर भरण्यास तयार होत नव्हते. ३१ सप्टेंबरच्या आत कर भरल्यास ५ टक्के सूट देण्यात आली होती, तरीदेखील नागरिकांमधून मनावा तसा प्रतिसाद पहायला मिळत नव्हता. त्यामुळे हिंजवडी ग्रामपंचायतीसह राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीची आर्थिक चाके फसली होती. परंतु ११ तारखेला सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि हळूहळू हे आर्थिक चक्र फिरायला सुरवात झाली. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्राची जुळवाजुळव सुरु झाली आणि बघता बघता अवघ्या दहा दिवसांतच हिंजवडी ग्रामपंचायतीच्या तिजोरीत तब्बल २२ लाख ८७ हजार रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला. त्यामुळे कोरोनाच्या काळात रुतलेले आर्थिक चाक निवडणुकीमुळे पुन्हा सुरु झाले आहे.
Share