पुणे
Trending

मुळशीत ४५ ग्रामपंचायत निवडणूकची लगीनघाई सुरू, सैनिकी शाळेत अर्ज स्विकृती

अर्जपुर्तीसाठी उमेदवारांच्या समोर अडचणींचे डोंगर

कासारअंबोली येथील सैनिकी शाळेत उमेदवारासह केवळ 4 जणांनाच एकत्रित अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज ग्राह्य धरला जाणार असून ऑनलाईन अर्जाची प्रिंट सैनिकी शाळेत उमेदवार व सूचक यांच्यासह स्वीकारली जाणार आहे. यासाठी स्वतंत्र निवडुणक अर्ज यंत्रणा तहसील कार्यालयाने सज्ज केली आहे.

 निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यापासून सदस्य व सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची मोठी लगबग सुरू झाली आहे. मुळशी तालुक्यात एकूण ४५ ग्राम पंचायतीच्या निवडणुका होत असून .
या ग्रामपंचायतीमधील सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांची अर्जपुर्तीसाठी सोबत जोडावयाच्या कागदपत्रांची जमवा जमवा करण्यासाठी अक्षरक्षा धांदल उडालेली दिसत आहे.
ग्रामपंचायती साठी सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया नागरिकांना सुलभ व्हावी याकरिता प्रशासनाच्या वतीने पुरेशी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली असून. यामध्ये इंटरनेट अथवा अन्य तांत्रिक अडचणी वगळता इच्छुक असलेल्या उमेदवाराना अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन व मदत निवडणूक शाखेत नियुक्त केलेले कर्मचारी करीत आहेत.
अभय चव्हाण,तहसीलदार मुळशी
निवडणूक आयोगाने यावेळी आपले अर्ज ऑनलाईनच भरण्याची सक्ती केलेली असल्याने मोठी पंचाईत झाली आहे. कारण ऑनलाईन साठी ग्रामीण भागात इंटरनेटची असलेली कमकुवत सुविधा व निवडणूक आयोगाची सतत हँग होणारी वेबसाईट यामुळे उमेदवार मंडळी त्रस्त झालेले आहेत. हे अर्ज भरण्याची मुदत जसजशी संपत येऊ लागली आहे तसतशी इच्छुक उमेदवारांची मोठी चलबिचल होताना पहायला मिळत आहे. अर्जासोबत जोडवयासाठी लागणाऱ्या कागडपत्रांची जंत्री मोठी असल्याने तसेच जातीचे दाखले काढणे, त्यांची  पडताळणी करणे यासारख्या वेळखाऊ कामाकरिता तहसील कार्यालयासमोर असलेल्या नागरी सुविधा केंद्रासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काही उमेदवारांची मतदार यादी व ओळख पत्रावरील नावात तफावत असल्याने त्यांना प्रतिज्ञा पत्र जोडणे अनिवार्य असल्याने त्यासाठी ही बऱ्याच जणांची धावपळ सुरू होती.
 ग्राम पंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवार म्हणून पहिल्यांदाच सहभागी होत आहे. मतदार यादीतील माझ्या चुकीच्या नावाची दुरुस्ती करून घेण्यापासून ते प्रत्यक्ष ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मला संघर्ष करावा लागत आहे. अजून माझा अर्ज मान्य होऊन प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसांपर्यंत काय काय पूर्तता कराव्या लागतील या विचारानेच माझ्यासारखा नवोदित उमेदवार खचून जाण्याची भीती वाटते.
रमेश आदमाणे , सदस्य पदासाठी इच्छुक उमेदवार, आंदगाव ता. मुळशी

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close