ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई; अवैध दारूसह कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकांमुळे तीन दिवस ‘ड्राय डे’ असणार

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी कारवाई करून बेकायदा मद्यविक्री केल्याप्रकरणी २७८ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमध्ये एक कोटी ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये तीन दिवस ‘ड्राय डे’ असणार आहे. जिल्ह्यामध्ये ७४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी १५ जानेवारीला मतदान आणि १८ जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा मद्यविक्री रोखण्यासाठी पथके नेमली आहेत. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे म्हणाले, ‘निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत २७८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये १६७ जणांना अटक झाली आहे. तसेच ११ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमध्ये एक कोटी ३५ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.’
‘या निवडणुकांमुळे तीन दिवस ‘ड्राय डे’ असणार आहे. १४ जानेवारीला मतदानाच्या अगोदरचा दिवस, १५ जानेवारीला मतदानाचा दिवस आणि १८ जानेवारीला मतमोजणीचा दिवस असून, या दिवशी मद्यविक्रीची दुकाने आणि बिअर बार बंद ठेवण्यात येणार आहेत. निवडणुका नसलेल्या परिसरातील दुकाने आणि बिअर बार सुरू राहणार आहेत’, असे झगडे यांनी स्पष्ट केले.
‘निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींच्या परिसरातील हॉटेल आणि ढाब्यांवर तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. दिलेल्या वेळेनंतर हॉटेल सुरू ठेवल्यास कारवाई केली जाणार आहे,’असे झगडे म्हणाले.