
मुंबई : काँग्रेस पक्षाला देशासह राज्यातील नेतृत्वावरुन सध्या मोठ्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्रात देखील काँग्रेस अध्यक्षपदासाठी मोठी खलबतं होताना दिसत आहेत. या सगळ्या चर्चेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. जर नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्ष पदासाठी कोण? हा सवाल उपस्थित होत आहे. जर पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे.
संग्राम थोपटे भोर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते यावेळी तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. वडील अनंतराव थोपटे कडवे काँग्रेस नेते म्हणून ओळखले जातात.त्यांनी मंत्री म्हणून काम केले होते. महाविकास आघाडीत मंत्रीपद न मिळाल्यामुळे संग्राम थोपटे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती.
नाना पटोलेंच्या विधानसभा अध्यक्षपदाची जागा घेण्यासाठी काँग्रेसमध्ये चढाओढ लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रापासून ते मराठवाड्यापर्यंत त्यासाठी लॉबिंग सुरु झाली आहे. यासाठी आमदार संग्राम थोपटे दिल्ली दरबारी दाखल झाले आहे. प्रभारी विधानसभा अध्यक्षाचा अनुभव व सर्वांशी जुळवून घेण्याची कार्यशैली मुळे संग्राम दादाच अध्यक्ष होणार अशी चर्चा पुण्यात रंगली.
Share