राजकीय
Trending
हिंजवडीत जांभुळकर, लवळे गावात गावडे, मारूंजीत बुचडे तर माणमध्ये भोईर होणार सरपंच- कासारअंबोली, भुकूममध्ये रस्सीखेच सुरूच

महावार्ता न्यूज ः मुळशीतील 45 गावात सरपंच उपसरपंच पदाचा गुलाल उधळण्यासाठी जय्यत तयारी झाली असून हिंजवडी, माण, लवळे व मारूंजी गावातील विजयी पॅनेलने एकजूटीने सरपंच पदाचा नाव निश्चित केले आहे. मात्र अनेक गावात रस्सीखेच अजून सुरूच असून यात कासारअंबोली व भुकूम ग्रामपंचायतीचे चर्चा सर्वात जास्त आहे.
सोमवारी सकाळपर्यंत सरपंच पदाची निवडणुकीबाबत संभ्रम होता. मात्र तो तहसीलदार अभय चव्हाण यांनी नवा शासकीय आदेशाव्दारे दूर करताच गावोगावी पुन्हा बैठका होऊन नावनिश्चितीचे सत्र सुरू झाले आहे. लक्षवेधी ठरलेल्या व श्रीमंत ग्रामपंचायत असणार्या हिंजवडी व माण गावासह शेतकर्याचे गाव अशी ओळख असणार्या लवळे, मारूंजी गावाने एकजूटीने सरपंच पदाच्या नावाची निश्चित केल्याची चर्चा आहे.

हिंजवडीत हॅटट्रिक करणारे गणेश जांभुळकर यांचे सरपंच पदासाठी तर मनिषा हुलावळे उपसरपंच पदासाठी नाव आघाडीवर आहे. 17 पैकी 15 जागांवर वर्चस्व प्रस्थापित करीत हिंजवडीत ग्रामदैवत म्हतोाबा परिवर्तनाची लाट उसळली असल्याचे मतमोजणीत सिध्द झाले. काँग्रेसचे अभ्यासू नेते संतोष साखरे, माजी उपसरपंच मल्हारी साखरे, केंद्रिय पद भूषवलेले शांताराम जांभुळकर, माजी जि. प सदस्या स्वाती हुलाावळे, तानाजी हुलावळे, दिलीप हुलावळे, सुरेश हुलावळे, प्रदिप साखरे, सूर्यकांत साखरे, कुंडलिक जांभुळकर, नामदेव जांभुळकर, संदिप साखरे, अरूण साखरेसह गावाने अभूतपूर्व एकजूटीने बिनविरोध सरपंच व उपसरपंच निवडणुकीसाठी नावे निश्चित केली असून ती अधिकृतपणे उद्या मंगळवारी जाहिर होणार आहे.
माण गावात सरंपच पदासाठी सुरूवातीपासून सुवर्णा नंदकुमार भोईर यांचे नाव आघाडीवर होते. नव्याने सरपंच सोडतीत बदल न झाल्याने सुवर्णा भोईर याच माणच्या नव्या सरपंच होईल अशी चर्चा गावात सुरू आहे. सभापती पांडूरंग ओझरकर यांच्या पॅनेलने बाजी मारली असून या विजयात अनुभवी नेते नंदकुमार भोईरची साथही मोलाची ठरली होती. यामुळे सरपंच पदासाठी नंदकुमार भोईर यांचे पारडे निवडणुकीपूर्वीच जड होते. मात्र उपसरपंच पदासाठी थोडी रस्सीखेच सुरू आहे.

मुळशीत हरित आणि प्रगतीशील गाव असणार्या लवळे गावातही एकजूटीने दर्शन घडले आहे. ग्रामपंचायतीने गेल्या 68 वर्षांची निवडणुकीची परंपरा मोडीत काढीत पहिल्यांदाच यावेळची निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळविले होते. आता सरपंच निवडणुकीची बिनविरोध होणार असून सरपंच पदासाठी निलेश गावडे तर उपसरपंच पदासाठी रणजीत राऊतचे नाव निश्चित झाले आहे. कार्यकुशल उद्योजक नाथा राऊत, संजय सातव व नीलेश गावडे यांनी घेतलेला पुढाकार आणि ग्रामस्थांनी दाखविलेले सामंजस्य , ऐक्य व सहकार्याने लवळ्यात ऐतिहासिक निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणूकीत पक्ष बाजूला ठेवून सक्षम व सामाजिक बांधिलकी जोपासणार्या तरूण उमेदवारांना बिनविरोध निवडून देण्यासाठी डॅा. विजय सातव, अशोक भोसले, तानाजी राऊत , बाळासाहेब टकले , राजाराम गावडे आदींनी तसेच ग्रामस्थांनी सहकार्य फळास आले.
लवळे ग्रामपंचायतीत केवळ 24 वर्षीय रणजीत तानाजी राऊत हा युवक ग्रामपंचायत सदस्य झाला आहे. इतक्या कमी वयात लवळे ग्रामपंचायतीचा सदस्य होण्याचा मान पहिल्यांदाच रणजीतने मिळविला असून आता कमी वयात उपसरपंच होण्याचा मानकरीही तो ठरणार आहे. लवळे ग्रामपंचायतीच्या इतिहासात ही पहिलीच घटना ठरणार आहे. शिवाय रंजित हा तरुण उच्चशिक्षित असून त्याने बी फार्मसी ही पदवी धारण केलेली आहे. त्यामुळे रणजीतचे कमी वय असूनही त्याच्या उच्च शिक्षणाचा लाभ ग्रामपंचायत विकासाला होणार असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

मारूंजीत काँग्रेसचे शिवाजी बुचडे यांच्या पॅनेलचा झेंडा फडकला असून गावाने पै. कृष्णा बुचडेला गाळ्यात सरपंच पदाची माळ टाकण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. उपसरपंच महिलेला मिळणार आहे. काळभैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने मारूंजीत गड जिंकल्यापासून बुचडे या आडनावाचा सरपंच होणार हे ठरले होेते.
आय टी पार्कमध्ये सरपंच पदासाठी गावाची, पॅनेलची एकजूट दिसत असताना मुळशीतील पूर्व भागातील अनेक गावात सरपंच व उपसरपंच दोन्ही पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे.
कासारअंबोलीत व भुकूम ग्रामपंचायतीमध्ये नावाबाबत निश्चिती न झाल्याने बैठकांचे सत्र सुरूच आहे. कासारअंबोलीत राष्ट्रवादीचा की शिवसेनेचा सरपंच याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना आघाडीचा सरपंच निवडुन येणार असे पॅनेलचे प्रमुख सांगत आहे.
पुणे शहराजवळील व नागरीकरण वेगाने होत असलेल्या भुकूम ग्रामपंचायतीचा कारभारी सोमवारी उशिरापर्यंत निश्चित झाला नव्हता. गावात नवे चेहरे निवडून आल्याने बिनविरोध सरपंच पदासाठीचा प्रस्ताव अनेकांना मान्य न केल्याने भुकूमचा नवा सरपंच कोण हे मंगळवारीच सकाळीच स्पष्ट होणार आहे.
Share